
रायगड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या तोंडावर पनवेल शहरातील बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गर्दी नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांनी नियोजन सुरू केले असतानाच रस्त्यालगतची अतिक्रमणे आणि विक्रेत्यांनी व्यापलेले पदपथ वाहतुकीच्या मुळावर उठले आहेत. अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही शुक्रवारी वाहतूक पोलिसांनाच रस्त्यावर उतरून कारवाई करावी लागल्याने ‘वाहतूक पोलिसांनीच महापालिकेचे कामही करायचे का?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
गणेशोत्सवात बाजारपेठेत मोठी गर्दी होणार असल्याने फडके नाट्यगृहासमोरील मराठी शाळा, नवीन तहसील कार्यालय, टपाल नाका परिसर, कर्नाळा सर्कल, लाईन आळी रोड आणि डी.एड. कॉलेजसमोरील मोकळ्या जागा वाहनतळासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र, काही वाहनतळांवर अद्याप स्वच्छता झालेली नसल्याने पार्किंगची जागा कागदावर आणि रस्त्यावर वाहनांची गर्दी, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
गर्दीनुसार एकेरी वाहतूक, सम-विषम पार्किंग आणि बॅरिकेडिंग केले जाणार आहे. उरण नाका ते टपाल नाका मार्गावर रिक्षा व चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी राहणार असून व्यापाऱ्यांसाठी माल चढ-उताराची वेळ दुपारी एक ते चार अशी निश्चित करण्यात आली आहे. फुल मार्केट परिसरातील काही मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
दरम्यान, बाजारपेठेतील अतिक्रमणे, कचरा आणि पदपथांवरील अडथळे हटविण्याची मागणी होत आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईनंतर ही बाब अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना पथक पाठवून कारवाईचे आदेश दिले.
गणेशोत्सवासाठी वाहतूक शाखेचे ७० कर्मचारी व सात अधिकारी तैनात आहेत. अतिरिक्त ५० वॉर्डनची मागणीही महापालिकेकडे करण्यात आली आहे.
मात्र पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्याबरोबरच महापालिकेने रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त केले नाहीत, तर वाहतूक नियोजनाचा फटका थेट नागरिकांनाच बसणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)