
कोल्हापूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। पंचायत समिती शिक्षण विभाग, हातकणंगले यांच्यावतीने तालुक्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी एक दिवसीय तालुकास्तरीय विशेष कार्यशाळेचे आयोजन संभाजीराव माने हायस्कूल, रुकडी येथे करण्यात आले होते.
गटशिक्षणाधिकारी जे. टी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत तालुक्यातील ३०० हून अधिक मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदवला. शालेय पोषण आहार अधीक्षक प्रकाश नलवडे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. यानंतर विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (कोल्हापूर) चे जिल्हा सल्लागार डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी कोटपा (COTPA) कायदा २००३, शाळा परिसरातील १०० यार्ड नियमाची अंमलबजावणी, शालेय तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना आणि तंबाखूमुक्त शाळेचे ९ निकष यावर सविस्तर मार्गदर्शन करत व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी शिक्षकांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
अन्न व औषध प्रशासन (FDA) कोल्हापूरच्या अन्न सुरक्षा अधिकारी अंजली ढाले व दिनेश हगवणे यांनी Safe Food for Every School Child in Maharashtra Order, 2026 अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व सकस अन्न मिळण्याच्या दृष्टीने घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.
समाज कल्याण विभागाचे अधिकारी गर्दे साहेब यांनी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली.
विस्तार अधिकारी ए. टी. बिरणगे व विषय तज्ज्ञ आबाजी कांबळे यांनी 'चला शाळेत जाऊया' अभियानाची सविस्तर रूपरेषा मांडली.
समन्वयक प्रवीण साळुंखे यांनी नवं भारत साक्षरता अभियानांतर्गत तालुक्याचे उद्दिष्ट आणि टॅगिंग प्रक्रियेबाबत माहिती दिली.
विशेष शिक्षिका वैशाली माने यांनी दिव्यांगांच्या सर्वेक्षणासाठी उपयुक्त असलेल्या 'प्रशस्त ॲप'च्या वापराबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले.
कार्यशाळेस तालुक्यातील १३ केंद्रांचे केंद्रप्रमुख, बी.आर.सी. सदस्य व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास संभाजीराव माने हायस्कूलच्या प्राचार्या श्रीमती निकम यांचे विशेष सहकार्य लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar