
नंदुरबार, 11 सप्टेंबर (हिं.स.) राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी (Green List) आज 11 सप्टेंबर 2026 रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच विविध राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमधील एकूण 1 हजार 345 लाभार्थी शेतकरी समाविष्ट आहेत, असे जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांनी एका शासकीय कळविले आहे.
ही यादी शेतकरांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी कार्यालय आणि बँक शाखांच्या स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीतील पात्र लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर (CSC Centre) जाऊन आपले आधार प्रमाणीकरण विनाशुल्क (निशुल्क) करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सर्व राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांना सूचना देण्यात आली आहे की, पात्र यादीतील शेतकऱ्यांकडून कोणतीही
रक्कम वसूल न करता शासनाच्या नियमांनुसार व 'हेरकट' (Haircut) निकषांनुसार कर्जमाफीचा लाभ
देण्यात यावा. या टप्प्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरणाऱ्या इतर शेतकऱ्यांची नवीन यादी देखील लवकरच जाहीर केली जाणार आहे.
या प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही शेतकऱ्याला काही अडचण किंवा तक्रार असल्यास त्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल करावी. तसेच ऑफलाईन स्वरूपात संबंधित सहायक निबंधक कार्यालयात किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अर्ज करता येईल. प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींवर जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखालील तक्रार निवारण समितीमार्फत योग्य तो निर्णय व कार्यवाही केली जाईल.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपले आधारप्रमाणीकरण (ई-केवायसी) लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच जिल्हा उपनिबंधक एस.वाय. पुरी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर