
रायगड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच पाली फाटा-खोपोली ते वाकण महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रायगड प्रशासनाने पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
१४ सप्टेंबरच्या गणेश प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर पेण, वडखळ, नागोठणे, वाकण, कोलाड, माणगाव, लोणेरे आणि पोलादपूर परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. कोंडी झाल्यास वाहनचालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पेण येथे कोंडी झाल्यास तरणखोप-पेण बायपास-गागोदे-वरसई-पाली-वाकण, तर वडखळ येथे पोयनाड-पेझारी-कुडूस-नागोठणे-वाकण मार्गाचा वापर करता येईल. नागोठणे-वाकण परिसरासाठी पाली-नांदगाव-विळे-निजामपूर-माणगाव तसेच कोलाडकडे जाणारे मार्ग उपलब्ध आहेत.
माणगाव येथे निजामपूर नाका-साईराम हॉटेल ब्रिज-मुगवली ब्रिज, तर लोणेरे येथे गोरेगाव-नांदवी-आंबेत-म्हाप्रळ मार्गाचा पर्याय राहणार आहे. पोलादपूरच्या दिशेने कोंडी झाल्यास टोळफाटा-आंबेत-म्हाप्रळ मार्गाचा वापर करता येणार आहे.
ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना ११ ते २६ सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)