
छत्रपती संभाजीनगर, ११ सप्टेंबर (हिं.स.) : जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात १० ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध आस्थापना, कारखाने आणि उद्योगांनी त्यांच्या रिक्त पदांची माहिती नोंदवून या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार महाकुंभाच्या पूर्वतयारीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त अमोल बळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाचे एस. के. गायकवाड, महावितरणचे स्वप्निल वाणी, वस्तू व सेवा कर कार्यालयाचे सहाय्यक राज्यकर आयुक्त पी. बी. चव्हाण, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे जी. एस. कुलकर्णी तसेच सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे दुकाने निरीक्षक सचिन अर्बट उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले की, विविध आस्थापनांमध्ये रिक्त असलेल्या पदांची माहिती तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील कुशल मनुष्यबळ आणि युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे हा रोजगार महाकुंभाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमामुळे उद्योग आणि आस्थापनांना त्यांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ कमी वेळेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
खासगी रुग्णालयांनीही सहभागी व्हावे
आरोग्य क्षेत्रातही रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याने जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी त्यांच्या रिक्त पदांची तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शासन आणि संबंधित आस्थापनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणाऱ्या युवकांना मानधन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सहाय्यक आयुक्त संजय गुरव यांनी रोजगार महाकुंभाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. उद्योग, नियुक्ती संस्था, कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि नोकरी इच्छुक उमेदवार या उपक्रमाच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे उद्योगांना त्यांच्या गरजेनुसार पात्र व कौशल्याधारित मनुष्यबळ उपलब्ध होईल, तर युवक-युवतींना विविध रोजगार संधींसाठी थेट नियुक्ती संस्थांशी संवाद साधता येणार आहे. उमेदवारांची थेट जागेवर निवड करण्याची संधीही या मेळाव्यात उपलब्ध होणार आहे.
१,२७८ उमेदवारांची ऑनलाइन नोंदणी
जिल्ह्यातील विविध ५० नियुक्ती संस्थांनी आतापर्यंत कुशल मनुष्यबळाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गुगल फॉर्मद्वारे प्रतिसाद नोंदविला आहे. तसेच १,२७८ उमेदवारांनी रोजगारासाठी ऑनलाइन नोंदणी केली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त संजय गुरव यांनी बैठकीत दिली.
बैठकीला जिल्ह्यातील विविध उद्योग, आस्थापना, संस्था, पतसंस्था तसेच खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संजय गुरव यांनी मानले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis