
अमरावती, ११ सप्टेंबर (हिं.स.) : आगामी सण-उत्सव तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३८ अन्वये अमरावती ग्रामीण पोलीस क्षेत्रात विनापरवाना ढोल-ताशे, बँड, ध्वनिक्षेपक तसेच मोठा आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
यासंदर्भातील आदेश अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जारी केले आहेत. संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अथवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी ठिकाणी गायन, वाद्यसंगीत, ढोल-ताशे, ध्वनिक्षेपक अथवा मोठा आवाज किंवा प्रतिध्वनी निर्माण करणारी उपकरणे वाजवता येणार नाहीत.
मोठ्या आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास, अस्वस्थता तसेच सार्वजनिक शांततेचा भंग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ध्वनीच्या वापरावर नियमन व नियंत्रण ठेवण्याचे अधिकार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १३६ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश ३१ डिसेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण अमरावती ग्रामीण पोलीस क्षेत्रात लागू राहणार आहे.
गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दिवाळी, गुरुनानक जयंती आणि नाताळ या सणांच्या काळात सामाजिक शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी नागरिक तसेच आयोजकांनी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी