रायगड - जिल्ह्यातील १,३७४ शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर
रायगड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील १ हजार ३७४ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीच
जिल्ह्यातील १,३७४ शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर


रायगड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील १ हजार ३७४ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून, आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्जखात्यात जमा केली जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. १ एप्रिल २०११ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे, तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी ऑनलाइन संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येत असून, महाआयटीमार्फत तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर रायगड जिल्ह्यातील बँकांनी १२ हजार ६८२ थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. संगणकीय छाननीनंतर आतापर्यंत ७ हजार ३६७ पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे.

पहिल्या यादीतील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आधार प्रमाणीकरण झालेल्या ३ हजार ३९२ लाभार्थ्यांना २०.४६ कोटी रुपयांची कर्जमुक्ती देण्यात आली आहे. उर्वरित खात्यांबाबत प्रमाणीकरण व अन्य कार्यवाही सुरू आहे. दुसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांची नावे संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहेत. या यादीतील लाभार्थ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

३१ मार्च २०२६ रोजीची कर्जबाकी ग्राह्य धरली जाणार असून, त्यानंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली थकबाकी तपासून नजीकच्या आपले सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण तातडीने करून घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande