
नवी दिल्ली , 11 सप्टेंबर (हिं.स.)।राजधानी दिल्लीमध्ये १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाच्या (आयबी) अलर्टनंतर दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी संभाव्य धोके लक्षात घेऊन निरीक्षण वाढवली आहे. काही संघटना किंवा गटांकडून व्हीव्हीआयपी नेत्यांच्या हालचालींमध्ये अडथळा आणणे, सुरक्षा व्यवस्थेत घुसखोरी करणे किंवा आंदोलनाच्या माध्यमातून परिषदेला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी अधिकाऱ्यांना भीती आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिंतींवर आक्षेपार्ह किंवा आंदोलनाशी संबंधित घोषणा लिहिणे, ड्रोन उडवणे तसेच व्हीव्हीआयपी मार्गावर घुसण्याचा प्रयत्न होण्याचा धोका आहे. त्यामुळे परिषद स्थळ, प्रमुख हॉटेल्स, व्हीव्हीआयपी मार्ग, महत्त्वाची सरकारी कार्यालये आणि प्रमुख वाहतूक केंद्रांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सुरक्षा यंत्रणा विविध देश आणि त्यांच्याशी संबंधित संवेदनशील मुद्दे लक्षात घेऊन संभाव्य धोक्यांचे मूल्यांकन करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, चीनशी संबंधित तिबेटी आंदोलन तसेच रशियाशी संबंधित मुद्द्यांबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. या मुद्द्यांचा वापर दिल्लीमध्ये आंदोलन किंवा कोणत्याही प्रकारची अस्थिरता निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी सुरक्षा यंत्रणांना भीती आहे.
याशिवाय, खलिस्तानशी संबंधित संभाव्य धोक्याचाही सुरक्षा आकलनात समावेश करण्यात आला आहे. या मुद्द्याशी संबंधित ई-मेल आणि इतर माहिती सुरक्षा यंत्रणांना वेळोवेळी मिळत असते. त्यामुळे सोशल मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवरही सुरक्षा यंत्रणांकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. आंदोलनाचे आवाहन, लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न, भडकावू मजकूर तसेच संभाव्य तोडफोड किंवा भित्तिचित्रांशी संबंधित संकेतांवर लक्ष ठेवले जात आहे.दिल्ली पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर व सुरक्षा यंत्रणांमध्ये रिअल-टाइम समन्वय आणि माहितीची देवाणघेवाण सुरू आहे. संभाव्य धोका वेळेत ओळखून तो रोखता यावा, यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.
ब्रिक्स परिषदेदरम्यान दिल्ली आणि आसपासच्या हवाई क्षेत्रातही विशेष सुरक्षा नियम लागू राहणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत दिल्लीपासून ३०० किलोमीटरच्या परिसरातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह इतर विमानतळांवर नियमित टेक-ऑफ आणि लँडिंगवर विशेष निर्बंध लागू राहतील.मात्र, काही विशिष्ट श्रेणीतील विमानांना उड्डाणाची परवानगी असेल. त्यामध्ये नियमित वेळापत्रकानुसार धावणारी प्रवासी विमाने,ब्रिक्सशी संबंधित परदेशी पाहुण्यांची विशेष विमाने, भारतीय वायुदल, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि एव्हिएशन रिसर्च सेंटरची विमाने, आपत्कालीन किंवा वैद्यकीय कारणांसाठी लष्करी हेलिकॉप्टर, राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणारी राज्य सरकारची विमाने आणि हेलिकॉप्टर या विमानांचा समावेश आहे .ब्रिक्सशी संबंधित विशेष विमानांच्या फ्लाइट प्लॅनला यापूर्वीच एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून (एटीसी) मंजुरी घेणे बंधनकारक असेल.
दिल्लीपासून ३०० किलोमीटरच्या परिसरात नियमित प्रवासी विमाने आणि ओव्हरफ्लाइट्सना त्यांच्या निर्धारित मार्गावरून उड्डाण करता येईल. मात्र, त्यांच्यासाठी उंचीबाबत विशेष नियम लागू असतील.दिल्लीपासून २०० किलोमीटर अंतराच्या आत येईपर्यंत चढणाऱ्या विमानाला एफएल-२९० म्हणजेच सुमारे २९ हजार फूट उंची गाठणे आवश्यक असेल. त्याचप्रमाणे उतरणाऱ्या विमानाला दिल्लीपासून २०० किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावर असेपर्यंत एफएल-२९०च्या खाली उतरण्यास सुरुवात करता येणार नाही.
सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून सफदरजंग विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थिती किंवा व्हीआयपी ड्युटीवर तैनात भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरना तसेच काही बीएसएफ आणि भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरना परवानगी दिली जाईल. या हेलिकॉप्टरचा वापर राष्ट्रीय सुरक्षा दलाशी (एनएसजी) संबंधित गरजांसाठीही केला जाऊ शकतो. दरम्यान, रोहिणी हेलिपॅड पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. निर्धारित परवानगीच्या श्रेणीत न येणाऱ्या विमानांना किंवा हेलिकॉप्टरना उड्डाण करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आधी सुरक्षा मंजुरी घेणे बंधनकारक असेल.
भारत १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये १८व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद भूषवत आहे. २०२६ मध्ये भारताकडे ब्रिक्सच्या अध्यक्षपदाची चौथ्यांदा जबाबदारी आहे. भारताने आपल्या अध्यक्षपदासाठी ‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि स्थैर्यासाठी उभारणी’ ही थीम निश्चित केली आहे.या शिखर परिषदेत विकास, स्थिरता, नवोन्मेष आणि ग्लोबल साऊथच्या प्राधान्यक्रमांवर विशेष भर दिला जाणार आहे. उच्चपदस्थ परदेशी नेते आणि विविध देशांचे प्रतिनिधीमंडळ दिल्लीमध्ये उपस्थित राहणार असल्याने संभाव्य आंदोलन, ड्रोनच्या हालचाली किंवा सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन रोखण्यासाठी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode