
छत्रपती संभाजीनगर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीस २५ वर्षे झाल्यानिमित्त दि.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोंबर याकालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. याअभियानाद्वारे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लोककल्याणाच्या योजनांचे लाभ पोहोचवा,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.
सेवा संकल्प अभियानात राबवावयाच्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजीत करण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. अध्यक्षस्थानी होते. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, कार्यकारी अभियंता जलसंधारण नरेंद्र कटके, उच्च शिक्षण सहसंचालक आर. एम. गव्हाणे, कौशल्य विकास विभागाचे सुरेश बहुरे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.सर्व क्षेत्रीय अधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
सेवा संकल्प अभियानात शासनाच्या विविध सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून द्यावयाचा आहे. त्यासाठी प्रत्येक विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवाप्रदानाचे नियोजन संबंधित विभागाने करावे. तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करून नागरिकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य द्यावे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले. यासंदर्भात दि.९ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्यात सविस्तर माहिती देण्यात आली आहे,असेही त्यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी ‘सेवा संकल्प अभियान’ विषयक सविस्तर माहिती देणारे सादरीकरण केले. त्यानुसार, या अभियानात १३ प्रकारचे विविध उपक्रम राबवावयाचे असून त्याद्वारे नागरिकांना विविध सेवा विविध विभागांमार्फत दिल्या जाणार आहेत. त्यात महसूल विभागामार्फत सेवासेतू अभियान, कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत इनोव्हेशन चॅलेंज, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत सेवा माझे योगदान,विकसित भारत संकल्प यात्रा, सेवा ज्योत यात्रा, शिक्षण विभागामार्फत विकसीत भारत या विषयावर चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी उत्सव, आशिर्वादाचा दिवा, योजनांच्या यशकथांवर आधारीत बदलाची गोष्ट, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आभार आणि संकल्पाची रांगोळी, जन कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी नमो सेवागाथा, जल,जन आणि सेवा संकल्प यात्रा,जनसेवक महाकुंभ ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येतील,अशी माहिती दिली.
अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती असून जिल्हाधिकारी हे अध्यक्ष, सर्व मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव असतील.
सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीस दि.१७ पासून सुरुवात होत असून त्यादृष्टिने कार्यक्रमांचे आयोजन करावे. अधिकाधिक लोकांपर्यंत सेवा पोहोचवाव्या असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.
०००००
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis