
छत्रपती संभाजीनगर, ११ सप्टेंबर (हिं.स.) : मनोज जरांगे यांच्या उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ पैठण तहसील कार्यालयाच्या आवारात ‘शोले स्टाईल’ आंदोलन करण्यात आले. प्रदीप ठोंबरे आणि बाळासाहेब काळे यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले.
मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन त्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ खळबळ उडाली.
आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदारांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली आणि मध्यस्थी केली. प्रशासनाच्या चर्चेनंतर प्रदीप ठोंबरे आणि बाळासाहेब काळे यांनी पाण्याच्या टाकीवरून खाली उतरत आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis