
लातूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
जुलैमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे बहरलेल्या खरीप हंगामाला ऑगस्टमधील पावसाच्या मोठ्या खंडाचा फटका बसला आहे. राज्यात ऑगस्टअखेर पावसाची तूट तब्बल ५४ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने अनेक भागांतील पिकांवर पाण्याअभावी ताण आला आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसह विविध खरीप पिकांची वाढ खुंटत असून, उत्पादन घटण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
यंदा जून-जुलैतील पावसाच्या आधारावर राज्यात खरीप पेरणीला वेग आला. ऑगस्ट अखेर किनगाव व परिसरात सुमारे ९० टक्के पेरणी पूर्ण झाली होती मात्र पेरणीनंतर पिकांना आवश्यक असलेल्या टप्प्यावर पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
विशेषतः सोयाबीन पीक सध्या फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाचा खंड पडल्याने फुलगळ, शेंगांची संख्या कमी होणे आणि ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेषतः सोयाबीन पीक सध्या फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाचा खंड पडल्याने फुलगळ, शेंगांची संख्या कमी होणे आणि दाणे भरण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सोयाबीन करपले...
हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा सोयाबीनचे भरघोस उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र ऐन वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. गेल्या महिनाभरापासून समाधानकारक पाऊस न झाल्याने राज्याच्या अनेक भागांत सोयाबीनचे पीक करपून गेले आहे.
काही भागांत पिके माना टाकू लागली आहेत. परिसरात अनेक भागांत दीर्घकाळ पाऊस नसल्याने सोयाबीन करपण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पावसाचा खंड आणखी वाढल्यास खरीप उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांची प्रत्यक्ष पाहणी, नुकसानीचे पंचनामे आणि बाधित शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis