
नाशिक, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यात मतदार यादी भागनिहाय दावे-हरकती दाखल करण्यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या उपस्थितीत शनिवार व रविवार दि.19, 20, 26 व 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतरदेखील सदर प्रक्रिया निरंतर सुरु राहिल. त्यानुषंगाने नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी तसेच आवश्यक असल्यास दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्याचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांनी कळविले आहे.
या मोहिमेंतर्गत 31 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत संबंधित मतदान केंद्राच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती दाखल करता येतील. तसेच 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह नमुना 6 भरून मतदार यादीत नाव नोंदवावे. मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी तसेच आवश्यक त्या दुरुस्तीसाठीही निर्धारित नमुन्यात अर्ज करता येणार आहे. या विशेष मोहिमेदरम्यान मतदार नोंदणी अधिकारी व संबंधित अधिकारी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI