
छत्रपती संभाजीनगर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। देशाच्या भविष्याची दिशा ठरविण्यात तरुणाईचा आवाज महत्त्वाचा ठरणार आहे. आपल्या कल्पना,नेतृत्वगुण, नवकल्पना,कला,तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या बळावर ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी योगदान देण्याची संधी आता धाराशिवच्या युवकांनाही मिळणार आहे. ‘विकसित भारत-युवा नेतृत्व संवाद २०२७’ या राष्ट्रीय उपक्रमातून निवड झालेल्या धाराशिवच्या विद्यार्थ्यांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘मेरा युवा भारत’*च्या वतीने हा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत आहे. युवकांच्या कल्पना,नेतृत्वगुण, नवकल्पना,कला आणि उद्योजकतेला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभागी करून घेणे,हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमात १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांसाठी सहा क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये विकसित भारत आव्हान, सांस्कृतिक, ‘डिझाईन फॉर भारत’, ‘हॅक फॉर सोशल कॉज’, युवा उद्योजक आव्हान आणि युवा संसद यांचा समावेश आहे, अशी माहिती ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी प्रतिक करंजकर यांनी माय भारत, धाराशिव कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
‘विकसित भारत आव्हान’मध्ये विविध टप्प्यांतून युवकांची निवड केली जाणार आहे. ‘डिझाईन फॉर भारत’ आणि ‘हॅक फॉर सोशल कॉज’ च्या माध्यमातून सामाजिक तसेच विकासात्मक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याची संधी युवकांना मिळेल.विशेष म्हणजे यंदा प्रथमच युवा उद्योजक आव्हान आणि युवा संसद या दोन क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे कल्पकता, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेबरोबरच लोकशाही मूल्ये, नेतृत्व आणि सार्वजनिक धोरणांविषयीची युवकांची समजही या राष्ट्रीय मंचावर पुढे येणार आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी,युवा क्लब,एनएसएस व एनसीसी स्वयंसेवक,नवउद्योजक, कलाकार,डिझायनर तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी प्रतिक करंजकर यांनी केले आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी युवकांचे वय १७ ऑगस्ट २०२६ रोजी १५ ते २९ वर्षे असणे आवश्यक आहे.जिल्हा व राज्यस्तरावरील निवडीनंतर राष्ट्रीय स्तरासाठी युवकांची निवड केली जाणार आहे. अंतिम राष्ट्रीय कार्यक्रम १० ते १२ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे.‘विकसित भारत क्विझ’ स्पर्धेसाठी १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांनी माय भारतवरील विकसित भारत क्विझ नोंदणी येथे नोंदणी करावी.नोंदणी करताना ‘5YQ1NK6X’ हा रेफरल कोड वापरणे अनिवार्य आहे.
‘विकसित भारत आव्हान’चा पहिला टप्पा ‘विकसित भारत प्रश्नमंजुषा’ हा आहे. या डिजिटल प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ ही अंतिम तारीख आहे.नोंदणीसाठी ‘मेरा युवा भारत’च्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
विकसित भारत आव्हान अंतर्गत प्रश्नमंजुषा,निबंध व सादरीकरण; सांस्कृतिक क्षेत्रात लोकनृत्य, लोकगीत,चित्रकला,वक्तृत्व व काव्यलेखन; ‘डिझाईन फॉर भारत’ अंतर्गत विकासात्मक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय; ‘हॅक फॉर सोशल कॉज’ अंतर्गत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर उपाय; युवा उद्योजक आव्हान अंतर्गत व्यवसाय संकल्पना व प्रारूप सादरीकरण तर युवा संसदच्या माध्यमातून लोकशाही मूल्ये,नेतृत्व आणि सार्वजनिक धोरणांची समज विकसित करण्याची संधी युवकांना मिळणार असल्याचे जिल्हा युवा अधिकारी प्रतिक करंजकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis