पीक पाहणीचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करा - जिल्हाधिकारी पुजार
छत्रपती संभाजीनगर, 11 सप्टेंबर (हिं.स. ) जून-जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.वेळेवर पेरण्या झाल्या आणि शिवारात पिकेही जोमाने उभी राहिली. मात्र,ऐन पीकवाढीच्या काळात पावसाने दीर्घ खंड दिल्याने हे आशादायी चित्र आ
पीक पाहणीचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करा - जिल्हाधिकारी पुजार


छत्रपती संभाजीनगर, 11 सप्टेंबर (हिं.स. ) जून-जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.वेळेवर पेरण्या झाल्या आणि शिवारात पिकेही जोमाने उभी राहिली. मात्र,ऐन पीकवाढीच्या काळात पावसाने दीर्घ खंड दिल्याने हे आशादायी चित्र आता बदलू लागले आहे.अपेक्षित पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष पाऊस खूपच कमी झाल्याने मोठी तूट निर्माण झाली असून त्याचा गंभीर परिणाम खरीप पिकांवर दिसून येत आहे.जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीचे प्राथमिक संकेत दिसू लागल्याच्या पार्श्वभूमीवर पीक पाहणीसाठी गठित तालुकास्तरीय समित्यांनी वस्तुनिष्ठ पीक पाहणी करून त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यासाठी विहित नमुन्यात तातडीने सादर करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खरीप हंगाम-२०२६ च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची आढावा बैठक झाली.समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी श्री.पुजार बोलत होते.बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप सेंगुलवार, पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ.मुळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.कटकधोंड,वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.मांजरमकर,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.चोपडे आणि कृषी विकास अधिकारी श्री.पाटील प्रत्यक्ष उपस्थित होते.सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

एकत्रित निष्कर्ष आणि शिफारशींसह अहवाल

जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले, ‘तालुकास्तरीय समित्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन एकत्रित निष्कर्ष आणि शिफारशींसह विविध प्रपत्रांमध्ये विहित नमुन्यात अहवाल सादर करावा.कृषी महाविद्यालयानेही पीक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण अहवाल द्यावा.दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केवळ सध्याच्या पीक परिस्थितीचा विचार करून चालणार नाही,तर पुढील काळात पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहील,यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित करावी.संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन चारा छावण्या आणि चारा डेपोचेही नियोजन करावे.त्यासाठी आवश्यक चारा उपलब्ध होईल याची पूर्वतयारी करावी.कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR) चारा उपलब्ध करण्यासाठी मदत घेण्याच्या सूचनाही श्री.पुजार यांनी दिल्या.

जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित ठेवा

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरणार असल्याने जिल्ह्यातील जलस्रोत सुरक्षित ठेवण्यावर प्रशासनाने भर द्यावा,असे जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलावांमधील उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी.हा पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवावा,असे त्यांनी स्पष्ट केले.भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी ‘रिचार्ज शाफ्ट’ची कामे हाती घ्यावीत.तसेच नवीन विहीर घ्यायची असल्यास संबंधितांनी दहा ‘जलतारा’ तयार केल्यानंतरच विंधन विहिरी तयार करण्याची परवानगी द्यावी,असे निर्देशही श्री.पुजार यांनी दिले.

पशुधन आणि चाऱ्याचे अचूक गणित मांडा

निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी पशुधन आणि उपलब्ध चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याची गरज अधोरेखित केली.पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील पशुधनाची संख्या आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या चाऱ्याच्या प्रमाणात तफावत राहणार नाही,याची दक्षता घ्यावी.गावागावांतील गोठे आणि त्यामधील पशुसंख्येची माहिती संकलित करावी.प्रत्येक कुटुंबाकडे किती पशुधन आहे,याची माहितीही उपलब्ध करून द्यावी, असे श्री.कडवकर यांनी सांगितले.

हिरवे पीक दिसत असले तरी सोयाबीनचा दाणा बारीक

सध्याच्या पीक परिस्थितीचे वास्तव मांडताना कृषी शास्त्रज्ञ श्री.गुट्टे यांनी पावसाच्या दीर्घ खंडामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले.ते म्हणाले,काही पिकांना आता पाऊस आला तरी त्याचा उपयोग होणार नाही. ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडला आहे.तापमान वाढत असून जमिनीला भेगा पडल्या आहेत.भारी जमिनीतील पिके वरून हिरवी दिसत असली, तरी सोयाबीनचा दाणा बारीक आहे.मात्र,येत्या एक-दोन दिवसांत पाऊस झाला तर काही पिकांना त्याचा उपयोग होऊ शकतो.असे श्री. गुट्टे यांनी सांगितले.

जून-जुलैच्या पावसाने शेतकऱ्यांच्या मनात चांगल्या हंगामाची आशा निर्माण केली होती.मात्र,ऑगस्टमधील दीर्घ पावसाच्या खंडामुळे आता शिवारातील परिस्थिती चिंताजनक बनत आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पीक परिस्थितीच्या अचूक पाहणीबरोबरच पशुधनासाठी चारा आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही लक्ष केंद्रित केले आहे.

बैठकीत उपस्थित विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सध्याची पीक परिस्थिती,पशुधनासाठी उपलब्ध चारा,विविध सिंचन प्रकल्प आणि तलावांमधील उपलब्ध पाणीसाठा तसेच संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande