
वर्धा, 11 सप्टेंबर (हिं.स.)
शेतकऱ्याचा सच्चा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा. मात्र, यंदाच्या पोळ्यात शेतकऱ्यांच्या आनंदासोबतच त्यांच्या व्यथाही बैलांच्या पाठीवर उमटल्या. बैलांच्या अंगावर विविध म्हणी आणि संदेश लिहून शेतकऱ्यांनी पाऊस, बाजारभाव आणि शेतीशी संबंधित प्रश्नांकडे लक्ष वेधले.
‘ये रे ये रे पावसा’ अशी आर्त हाक बैलांच्या पाठीवरून देण्यात आली. पावसाची प्रतीक्षा, पिकांची चिंता आणि शेतीच्या भवितव्याची काळजी यांचे प्रतिबिंब या संदेशातून दिसून आले. त्यासोबतच ‘इथेनॉलचा डंका, आम जनतेला ठणका’ या उपरोधिक संदेशातून इथेनॉल धोरणाबाबत शेतकऱ्यांच्या मनातील नाराजी व्यक्त झाली. ‘भाव ठरतो सरकारात, शेतकरी रडतो बाजारात’ या संदेशातून शेतीमालाच्या बाजारभावाचा प्रश्न अधोरेखित करण्यात आला. उत्पादनासाठी वाढता खर्च, बाजारातील अनिश्चित भाव आणि हवामानातील बदल यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. बैलपोळ्याच्या पारंपरिक उत्साहात यंदा शेतकऱ्यांनी आपल्या सच्च्या साथीदाराच्या पाठीवरूनच आपल्या व्यथा समाजापर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे बैलांच्या सजावटीसोबतच त्यांच्या पाठीवरील संदेशांनीही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
घोराडचे शेतकरी सुनील पोहाणे यांची बैलजोडी सामाजिक विषयांतून लोकजागृती करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यंदा चित्रकार आशीष पोहाणे यांनी त्यांच्या कुंचल्यातून समाजप्रबोधनाचा संदेश दिला. बैलांच्या पाठीवर रंगवलेली घोषवाक्ये शेतकऱ्यांचे दुःख, शासनावरील टीका आणि न्यायाची मागणी यांचा आवाज ठरली. या अनोख्या कल्पकतेमुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी