
‘शिलर’ व्हेंटिलेटर्सची खरेदी ठाकूर पालकमंत्री असतानाच झाल्याचा दावा
अमरावती, ११ सप्टेंबर (हिं.स.) : जिल्हा महिला सामान्य रुग्णालयातील तीन नवजात अर्भकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेवरून काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे. शिलर कंपनीच्या व्हेंटिलेटर्सच्या खरेदीवरून भाजपावर करण्यात आलेले आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असल्याची टीकाही त्यांनी केली.
शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर्स जिल्हा महिला रुग्णालयात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि यशोमती ठाकूर अमरावतीच्या पालकमंत्री असताना खरेदी करण्यात आल्याचा दावा कुळकर्णी यांनी केला. या व्हेंटिलेटर्सच्या खरेदी प्रक्रियेला १८ फेब्रुवारी २०२२ रोजी मंजुरी देण्यात आली होती, तर त्यासंदर्भातील शासन निर्णय ६ जून २०२२ रोजी जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“यशोमती ठाकूर यांनी आपल्या कार्यकाळात लावण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सवरूनच आता भाजपावर आरोप करणे योग्य नाही,” असे कुळकर्णी म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सातत्याने खोटे आरोप केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली असल्याचे कुळकर्णी यांनी सांगितले. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाने रुग्णालयातील पाच जणांना निलंबित केले असून, त्यात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही कसूर झाली आहे का, याचीही चौकशी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे कुळकर्णी यांनी स्पष्ट केले.
चौकशी पूर्ण होण्याची प्रतीक्षा न करता केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप करणे हा काँग्रेसचा स्वभाव झाला आहे, अशी टीका त्यांनी केली. जिल्हा महिला रुग्णालयातील तीन नवजात अर्भकांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या घटनेचे राजकारण न करता चौकशीला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयातील प्रकरणावरून तथ्यहीन आरोप करणे थांबवावे, अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी केली.
-------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी