
- सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
- तिघांची वेतनवाढ कायमस्वरूपी रोखली
नाशिक, ११ सप्टेंबर (हिं.स.) : इगतपुरी तालुक्यातील फेरफार नोंदी आणि महसूल अभिलेखांच्या कामकाजात आढळलेल्या अनियमिततेप्रकरणी महसूल विभागाने कठोर कारवाई केली आहे. तीन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना (तलाठी) तत्काळ निलंबित करण्यात आले असून, दोन ग्राम महसूल अधिकारी आणि एका मंडळ अधिकाऱ्याची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जी. व्ही. एस. पवन दत्ता यांनी दिले आहेत. एकाच वेळी सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
फेरफार नोंदींच्या तपासणीदरम्यान ऑनलाइन नोंदी, वारस नोंदी तसेच जमीन महसूल अभिलेखांशी संबंधित कामकाजात विविध त्रुटी आढळून आल्या. काही प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नव्हती. तसेच संबंधितांना नोटिसा बजावण्याच्या प्रक्रियेतही त्रुटी राहिल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
याशिवाय, तपासणीसाठी मागविण्यात आलेली काही मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावून खुलासे मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या खुलाशांची छाननी केल्यानंतर दोष निश्चित करून विभागीय स्तरावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.
फेरफार नोंद ही जमिनीच्या हक्काशी संबंधित अत्यंत महत्त्वाची महसूल नोंद असल्याने या प्रक्रियेत कागदपत्रांची योग्य पडताळणी आणि अभिलेखांची अचूक नोंद अपेक्षित असते. या प्रक्रियेत झालेल्या त्रुटींची गंभीर दखल घेत महसूल विभागाने ही कारवाई केली आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणांमध्ये पुढील विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली आहे. या चौकशीत दोष आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI