शाळेत जाते म्हणत घराबाहेर पडल्या; तीन अल्पवयीन मुली बेपत्ता, अमरावतीत खळबळ
अमरावती, 11 सप्टेंबर (हिं.स.)। वलगाव आणि तिवसा ठाण्याच्या हद्दीतून शाळेला निघालेल्या तीन अल्पवयीन मुली अचानक गायब झाल्यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागला आहे. बुधवारी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनांमुळे खळबळ उडाली असून पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली
शाळेला जाते म्हणत घराबाहेर पडल्या; तीन अल्पवयीन मुली बेपत्ता, अमरावतीत खळबळ


अमरावती, 11 सप्टेंबर (हिं.स.)।

वलगाव आणि तिवसा ठाण्याच्या हद्दीतून शाळेला निघालेल्या तीन अल्पवयीन मुली अचानक गायब झाल्यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागला आहे. बुधवारी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनांमुळे खळबळ उडाली असून पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

पहिली घटना वलगाव ठाण्याच्या हद्दीतील असून, येथील १५ आणि १४ वयाच्या दोन शाळकरी मैत्रिणी ८ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे शाळेत जातो असे सांगून घराबाहेर पडल्या. मात्र, त्या शाळेत पोहोचल्याच नाहीत. सकाळी साडेअकराच्या सुमारास त्या वलगाव रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाताना एका परिचित व्यक्तीला दिसल्या होत्या. त्यामुळे शाळेसह रेल्वे स्टेशन परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला. दिवसभर शोध घेऊनही दोन्ही मुलींचा पत्ता लागला नाही. अखेर पालकांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दुसरी घटना तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. पूर्व माध्यमिक शाळेत शिकणारी १३ वर्षीय मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली, पण ती शाळेमध्ये पोहोचलीच नाही. वर्गशिक्षिकेने पालकांना फोन करून याची माहिती दिल्यानंतर कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. याप्रकरणी मोझरी येथील २१ वर्षीय प्रीतम नावाच्या तरुणाने आपल्या नातीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय मुलीच्या आजोबांनी व्यक्त केला असून, तिवसा पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande