
पुणे, ११ सप्टेंबर (हिं.स.)। गेल्या ४० वर्षांपासून कागदावर असलेल्या उच्च द्रूतगती वर्तुळाकार मार्गाच्या (एचसीएमटीआर) प्रकल्पाला आता महापालिका प्रशासनाकडून वेग देण्यात येत आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत प्रकल्पाच्या निविदा काढून, त्यानंतर तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मात्र, प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, टेकड्यांवर फोडकाम तसेच नागरिकांची घरे बाधित होण्याची शक्यता असल्याने सामाजिक, पर्यावरण आणि वाहतूक क्षेत्रातील विविध संस्था-संघटनांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.
एचसीएमटीआरच्या प्रस्तावित मार्गासाठी हजारो झाडे तोडली जाण्याची आणि टेकड्यांवर फोडकाम करण्याची शक्यता आहे. तसेच प्रकल्पामुळे अनेक नागरिकांची घरे बाधित होऊन त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे. प्रकल्पाच्या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे. नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आयुक्तांनी त्यांच्यासोबत संयुक्त बैठक घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
पुण्यातील वाढती वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एचसीएमटीआर प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यासाठी बैठका सुरू आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील सामाजिक, पर्यावरण आणि वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुमारे ३९ प्रतिनिधींनी एकत्र येत ‘एचसीएमटीआर नागरिक कृती समिती’ स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून प्रकल्पाच्या विविध बाबींवर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
एचसीएमटीआरच्या प्रस्तावित मार्गामुळे पर्यावरणीय हानी, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड आणि टेकड्यांवर होणारे परिणाम यांसह बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका समितीने मांडली आहे. त्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्याच्या पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांचा सखोल अभ्यास करावा, तसेच नागरिकांशी व्यापक चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु