
पुणे, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
पुणे महापालिकेतील रस्ते आणि पथ विभागातील निविदा प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही विभागांच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या दृष्टीने सल्लागार संस्थांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या निर्णयानुसार मे. इन्फ्राकिंग कन्सलटंट आणि मे. केश्याक कन्सलटंट या दोन संस्थांचे करार तडकाफडकी संपुष्टात आणण्यात आले आहेत.अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी याबाबत आदेश काढले असून, दोन्ही सल्लागार संस्थांची सेवा आजपासूनच समाप्त झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.पुणे महापालिकेच्या पथ विभागातील कामकाजासाठी इन्फ्राकिंग कन्सलटंटची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही काळापासून पथ विभागातील निविदा प्रक्रियेवरून सातत्याने प्रश्न उपस्थित होत होते. निविदांच्या अटी-शर्तींवरून वाद निर्माण झाले होते. तसेच या प्रक्रियेत भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले होते.या वादांमुळे काही निविदा रद्द करण्यात आल्याने रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. परिणामी, त्याचा थेट परिणाम शहरातील नागरिकांवर होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सल्लागार संस्थांबाबत कठोर भूमिका घेत त्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु