सोलापूर जिल्ह्यात १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे
सोलापूर, ११ सप्टेंबर (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर-2026) कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी विशेष म
Voter


सोलापूर, ११ सप्टेंबर (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर-2026) कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला आवश्यक आदेश दिले आहेत.

एसआयआर-2026 अंतर्गत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी दावे व हरकती सादर करण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती तसेच पात्रतेनुसार नाव वगळण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

विशेष सखोल पुनरिक्षण सुरू होण्यापूर्वी सोलापूर जिल्ह्याच्या मतदार यादीत सुमारे ३९.४१ लाख मतदार होते. पुनरिक्षणाच्या प्रारूप मतदार यादीत गैरहजर, स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे सुमारे ३.४६ लाख मतदारांची नावे समाविष्ट होऊ शकली नाहीत. अशा मतदारांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करून घेण्याची संधी दावे व हरकतींच्या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, ऑक्टोबर २०२४ नंतर मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम झालेला नसल्याने १ ऑक्टोबर २०२४ नंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना आतापर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता आले नव्हते. आता १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व पात्र नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेता येणार आहे.

विशेष शिबिरांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच ४ सप्टेंबर रोजी सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून शिबिरांचे नियोजन आणि अंमलबजावणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande