
पुणे, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
पुणे शहरातील गणेशोत्सवाला देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात
गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. शीतल तेली-उगले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासनासह सर्व विभागांनी चांगली तयारी केली आहे. गणेशोत्सवासाठी रेल्वे, बस तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नागरिक पुण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक रेल्वेगाडीनंतर मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडतील. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. यासाठी त्या त्या दिवशी आणि गर्दीच्या वेळेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध करून द्यावी.
गणेशोत्सव काळात विविध गणेश मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही कार्यक्रमांना हजारो नागरिक उपस्थित राहतात. त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी वाहतूक व गर्दीचे स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक आहे. वाहतुकीतील बदल, पर्यायी मार्ग, पार्किंग व्यवस्था तसेच गर्दीच्या ठिकाणांची माहिती नागरिकांना वेळेत द्यावी, अशा सूचना त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु