काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन
पुणे, १२ सप्टेंबर (हिं.स.) : प्रदेश काँग्रेसचे माजी प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यान आज, शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने
रत्नाकर महाजन


पुणे, १२ सप्टेंबर (हिं.स.) : प्रदेश काँग्रेसचे माजी प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यान आज, शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पुरोगामी विचारांच्या चळवळीतील एक अभ्यासू, लढवय्या आणि वैचारिक नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

रत्नाकर महाजन हे राज्य नियोजन महामंडळाचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्षपदही भुषविले होते. समाजवादी विचारवंत , राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसशी शेवटपर्यंत इमान कायम राखणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. रत्नाकर महाजन हे डॉक्टर होते. मात्र, समाजवादी विचारसरणीने प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला. रत्नाकर महाजन यांनी आणीबाणीच्या काळात सक्रियपणे काम केले होते. त्यांना त्यावेळी तुरूंगवासही सहन करावा लागला होता. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान आदी पुरोगामी विचारवंतांच्या विचारांचा पगडही त्यांच्यावर होता. समाजवादासोबतच त्यांनी आगरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे प्रत्यक्षात आचरणात आले होते. त्यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि पदे भुषविली. याच प्रवासात ते काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते झाले. युक्रांद-युवक क्रांती दल, सेवा दल, भारत जोडो अभियान, विद्यार्थी चळवळीत त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला.

समाजवादासोबतच आगरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे त्यांनी केवळ समर्थनच केले नाही, तर ते आपल्या आचरणातूनही जपले. इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव हे त्यांचे मूळ गाव होते. महाजन यांचा जन्म 14 जून 1946 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदापूर येथे झाले. शालेय जीवनापासूनच सामाजिक आणि वैचारिक चळवळीशी त्यांचा संबंध आला. वाचनाची त्यांना मोठी आवड होती. उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि पुढे पुणे हेच त्यांचे कर्मक्षेत्र बनले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरीही केली. या काळात विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला. त्यातून त्यांच्या सामाजिक आणि वैचारिक कार्याला अधिक व्यापक दिशा मिळाली.

महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये सामाजिक आणि वैचारिक जाणीव निर्माण करण्यासाठी डॉ. महाजन यांनी 'लोकबोधिनी' या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून युवक-युवतींसाठी विविध शिबिरे आणि प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात आले. त्यांच्या या सामाजिक कार्यात पत्नी हेमा महाजन यांची खंबीर साथ लाभली. तसेच आयुष्यभर जोडलेल्या असंख्य मित्रांचा सहवासही त्यांच्या कार्याला बळ देणारा ठरला.

अभ्यासू वृत्ती, समाजाप्रती असलेली बांधिलकी, कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावीपणे मांडणी करण्याची हातोटी आणि पुरोगामी विचारांची निष्ठा यामुळे डॉ. महाजन यांना राजकारणातही महत्त्वाची संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांची राज्य नियोजन मंडळाच्या कार्याध्यक्षपदी दोन वेळा नियुक्ती झाली. या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा होता. या काळात त्यांनी मांडलेला मानवी विकास अहवाल विशेष चर्चेत आला आणि तो लोकाभिमुख ठरला. मात्र, काही राजकीय मतभिन्नतेमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या बुद्धिमत्ता, अभ्यासू वृत्ती आणि प्रभावी वक्तृत्वाचा विचार करून त्यांच्यावर प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी आणि पुरोगामी विचारांची मशाल ते आयुष्यभर घेऊन चालले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी वैचारिक आणि सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली असून, एक संवेदनशील आणि अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande