
अर्धापूर–मुदखेड–भोकर तालुक्यांतील योजनेची अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत पाहणी
नांदेड, १२ सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शिवसेना–उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ‘मराठवाड्याचा विकास… तुमसे ना हो पायेगा!’ या जनआंदोलनांतर्गत विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत इसापूर धरण येथे अर्धापूर, मुदखेड आणि भोकर या तीन तालुक्यांतील १८३ गावांच्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी करण्यात आली.
सुमारे ५५० कोटी रुपयांच्या या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १३२ पैकी ९२ पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण झाले असले, तरी उर्वरित कामे अपेक्षित वेगाने सुरू नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तीन तालुक्यांतील १८३ गावांना पाणीपुरवठा करण्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला अपेक्षित गती मिळत नसल्याने नागरिकांना आणखी किती काळ पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला.१८३ गावांतील नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करायला लावून विकासाच्या घोषणा केवळ कागदावरच ठेवायच्या का, असा सवाल उपस्थित करत योजनेची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
इसापूर धरणातील उपलब्ध पाण्याचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करून ही योजना तातडीने पूर्ण करावी आणि तीनही तालुक्यांतील नागरिकांना प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पाणीपुरवठा योजनेची कामे संथगतीने सुरू राहिल्यास १८३ गावांतील नागरिकांच्या पाणीप्रश्नात आणखी भर पडण्याची शक्यता असून, शासन आणि प्रशासनाने या योजनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन कामांना गती द्यावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis