
मोकी, चीन, १२ सप्टेंबर (हिं.स.) ड्रॅग-फ्लिक विशेषज्ञ सुप्रियाने शानदार हॅट-ट्रिक साधली, ज्यामुळे गतविजेत्या भारताने एएचएफ ज्युनियर महिला आशिया कपच्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण कोरियाला ५-१ ने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने संपूर्ण सामन्यात आपले वर्चस्व कायम ठेवले आणि विजेतेपद राखण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले.
१३ व्या मिनिटाला मधू सिदारने भारतासाठी पहिला गोल केला. त्यानंतर १७ व्या मिनिटाला सुप्रियाने पेनल्टी कॉर्नरवर अचूक ड्रॅग-फ्लिक मारून भारताची आघाडी दुप्पट केली.
भारताने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला आणि २१ व्या मिनिटाला सुखवीर कौरने शानदार गोल करून संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय बचावफळीने दक्षिण कोरियाचे प्रयत्न हाणून पाडले आणि मध्यंतरापर्यंत तीन गोलची आघाडी कायम ठेवली.
तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताने पुन्हा एकदा दबाव आणला. ३३ व्या मिनिटाला सुप्रियाने पेनल्टी कॉर्नरवर आणखी एका शानदार ड्रॅग-फ्लिकद्वारे आपला दुसरा गोल नोंदवून भारताला ४-० अशी आघाडी मिळवून दिली.
४१ व्या मिनिटाला दक्षिण कोरियाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. युरी जोंगने सेट पीसवर गोल करून स्कोअर ४-१ असा केला, ज्यामुळे पुनरागमनाची आशा निर्माण झाली. तथापि, त्यानंतर भारतीय खेळाडूंनी आपला बचाव अधिक मजबूत केला आणि कोरियन संघाला कोणतीही स्पष्ट संधी मिळू दिली नाही.
भारताने शेवटच्या क्वार्टरमध्ये आक्रमक भूमिका कायम ठेवली आणि ५६ व्या मिनिटाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळवला. सुप्रियाने या संधीचे गोलमध्ये रूपांतर करून आपली हॅट-ट्रिक पूर्ण केली, ज्यामुळे भारताचा ५-१ असा प्रभावी विजय निश्चित झाला.
गतविजेता भारत आता विजेतेपदाच्या सामन्यात चीन आणि जपान यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या विजेत्याशी सामना करेल. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या ध्येयाने अंतिम सामन्यात उतरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे