
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.) भारतीय महिला क्रिकेट संघाची क्रिकेटपटू हरलीन देओल, महिला कॅरिबियन प्रीमियर लीग (डब्ल्यूसीपीएल) च्या उर्वरित सामन्यांसाठी गतविजेत्या बार्बाडोस ट्रायडंट्स संघात सामील झाली आहे. बार्बाडोस संघात सामील होणारी हरलीन ही पाचवी परदेशी क्रिकेटपटू आहे. देओल सध्या भारतीय संघाचा भाग नाही, त्यामुळे ती हंगामाच्या अखेरपर्यंत बार्बाडोस ट्रायडंट्ससाठी उपलब्ध असेल. तिच्यामुळे ट्रायडंट्स संघाला अधिक मजबूती आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळेल. या संघात आधीच किरण नवगिरे आणि पूजा वस्त्रकार यांचा समावेश आहे. बार्बाडोस ट्रायडंट्सने सोशल मीडियावर हरलीन देओलचा फोटो शेअर करून तिचे संघात स्वागत केले.
हरलीन टी-२० फॉरमॅटमधील एक अत्यंत उपयुक्त खेळाडू आहे. तिने भारतीय संघासाठी २० डावांमध्ये एका अर्धशतकासह ३११ धावा केल्या आहेत. तिचा स्ट्राइक रेट ९२.०१ आहे. तिच्या नावावर सहा बळीही आहेत. भारतासाठी तिचा शेवटचा सामना यावर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. हरलीनने महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स संघांकडून खेळले आहे. तिने २८ WPL सामन्यांमध्ये ११५.६८ च्या स्ट्राइक रेटने ६४९ धावा केल्या आहेत.
WCPL २०२६ मधील इतर भारतीय क्रिकेटपटू शिखा पांडे आणि यास्तिका भाटिया आहेत, या दोघीही ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाकडून खेळत आहेत. ट्राइडेंट्सने यावर्षीच्या स्पर्धेत आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे, ज्यात ५ सप्टेंबर रोजी झालेल्या सलामीच्या सामन्यात त्यांना नाइट रायडर्सकडून २१ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्या सामन्यात तीन भारतीय क्रिकेटपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. शिखा पांडे (१७ धावांत ३ बळी), यास्तिका भाटिया (२८ चेंडूंत ३५ धावा) आणि नवगिरे (२१ चेंडूंत २८ धावा) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे