
कोल्हापूर, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
गुजरातमधील वनतारा मधून माधुरी हत्तीणीचे नांदणी मठात मध्यरात्री 2 वाजता पुनरागमन झाले आणि नांदणी गाव हर्षोल्हास आणि आनंदाने न्हाऊन निघाले. ढोल ताशाचा गजर, फटाक्याची अतिशबाजी, फळांची आरास, फुलांचा वर्षाव करीत कोल्हापूर जिल्हयातील तमाम जनतेने माधुरी हत्तीणीचे भव्य स्वागत केले.
नांदणी येथील जैन मठात गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ असलेल्या माधुरी हत्तीणीच्या पालन पोषण, आरोग्य, सुरक्षा, आणि सोयी सुविधा याबाबत 'पेटा' संस्थेने तकार केली होती. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. या प्रकरणी एक उच्चाधिकार समितीही नेमण्यात आली तरीही माधुरी हत्तीण वनतारा येथे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झाले. माधुरी हत्तीण नांदणी मठातच रहावी यासाठी नांदणी मठाचे स्वामी, माजी खा. राजू शेट्टी यांचेसह सर्वच राजकीय नेते आणि कोल्हापूर जिल्हयातील जनतेने आंदोलनासह न्यायालयीन लढा दिला.
अखेर 'वनतारा' संस्थेने माधुरीसाठी नांदणी येथेच निवारा व्यवस्था करण्यासाठी आवश्यक सहकार्य केले.आणि 'माधुरी'ला नांदणी मठात पाठवण्याची खास व्यवस्था केली. दोन दिवसापूर्वी वनतारा मधून निघालेल्या माधुरीचे महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश केल्या नंतर तसेच पुणे शहरात, आणि कोल्हापूर जिल्हयात आल्यानंतर किणी टोल नाका येथेही नागरीकांनी उत्साहात स्वागत केले.
माधुरीला घेऊन आलेली व्हॅन आणि सोबतची टीम मध्यरात्री 2 वाजता नांदणी मध्ये पोहचली. स्वागतासाठी हजारो नागरीक जागून वाट पहात थांबले होते.
व्हॅन मधून माधुरीला खाली उतरून घेतल्या नंतर जल्लोष करीत माधुरीचे पंचारतीने औक्षण करून पुलांचा वर्षाव करून स्वागत केले. हा तमाम कोल्हापूरकरांच्या संघर्ष निष्ठा आणि प्रेमाचा विजय आहे. तसेच यापुढे माधुरीला जिवापाड जपणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar