मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीत अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
रत्नागिरी, 13 सप्टेंबर (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावर खवटी (ता. खेड) गावानजीक सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सतीश निवृत्ती पाटे (वय २९, रा. पोलादपूर) अ
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीत अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


रत्नागिरी, 13 सप्टेंबर (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावर खवटी (ता. खेड) गावानजीक सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सतीश निवृत्ती पाटे (वय २९, रा. पोलादपूर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून, अक्षता अरविंद कवडे (वय २८, रा. चिपळूण) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाकरिता सतीश पाटे आणि अक्षता कवडे हे दोघे दुचाकीवरून पोलादपूरहून चिपळूणच्या दिशेने निघाले होते. चिपळूणकडे येत असताना खवटी गावानजीक दत्त मंदिरासमोर दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ती महामार्गालगत असलेल्या २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात सतीश पाटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अक्षता कवडे या गंभीर जखमी झाल्या.

घटनेची माहिती मिळताच मदतकार्य तात्काळ सुरू करण्यात आले. जगद्गुरू रामानंदचार्य श्री नरेंद्र्राचार्यजी महाराज संस्थानने भरणे नाका पुलाखाली अपघातासाठी २४ तास कार्यरत असणारी मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमी अक्षता कवडे यांच्यासह सतीश पाटे यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सतीश पाटे आधीच मरण पावल्याचे सांगितले. गंभीर जखमी अक्षता कवडे यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande