
सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।
सन २०२६-२७ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ (सूक्ष्म सिंचन) योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
योजनेचा लाभ ५ हेक्टर क्षेत्रापर्यंत घेता येणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त अर्जांवर ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार कार्यवाही केली जाणार असून, अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे माहिती देण्यात येणार आहे.
चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता असल्याने अर्ज भरताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूर्वसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीच्या अधिकृत वितरकाकडून सूक्ष्म सिंचन संचाची खरेदी करता येईल. संच बसवल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष तपासणी केली जाईल. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर अनुदान जमा केले जाणार आहे.
योजनेच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार कार्ड, बँक पासबुक आणि जातीचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा सामाईक सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड