राजापूरजवळील अपघातात सिंधुदुर्गातील १६ गणेशभक्त जखमी
रत्नागिरी, 13 सप्टेंबर (हिं.स.) । गणेशोत्सवानिमित्ताने मुंबईहून कुणकवळे (ता. मालवण) येथे निघालेल्या चाकरमान्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला आज सकाळी नऊच्या सुमारास हातिवले (ता. राजापूर) येथील हॉटेल शिवानंदसमोर झालेल्या अपघातात १६ जण जखमी झाले. मुंबईतू
अपघातग्रस्त टेम्पोट्रॅव्हलर


रत्नागिरी, 13 सप्टेंबर (हिं.स.) । गणेशोत्सवानिमित्ताने मुंबईहून कुणकवळे (ता. मालवण) येथे निघालेल्या चाकरमान्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला आज सकाळी नऊच्या सुमारास हातिवले (ता. राजापूर) येथील हॉटेल शिवानंदसमोर झालेल्या अपघातात १६ जण जखमी झाले.

मुंबईतून कुर्ला येथून कुणकवळे येथे निघालेल्या या टेम्पो ट्रॅव्हलर्सच्या (क्र. डीडी ०१ एजी ९५७३) चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या मोरीवर आदळून हा अपघात झाला. त्यामध्ये चालकासह १६ प्रवासी जखमी झाले. सर्व प्रवासी एकाच कुटुंबातील असून त्यातील दहा जणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.

टेम्पो ट्रॅव्हलर्स अक्षय सुनील यादव (वय ३०, रा. रहिमतपूर) चालवत होता. हातिवले गावाजवळ त्यांची गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाहेर जाऊन मोरीवर आदळली. अपघातात चालकासह सर्व प्रवासी जखमी झाले. त्यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. गंभीर जखमी झालेले प्रवासी असे - चालक अक्षय सुनील यादव (वय ३०), सखाराम महादेव देसाई (वय ६८), शशिकांत नारायण देसाई (वय ४७), सुषमा सखाराम देसाई (वय ६५), राकेश सखाराम देसाई (वय ३८), ऋचा राजेश देसाई (वय ३५), आयाध्य राजेश देसाई (वय ४), संतोष महादेव देसाई (वय ५३), स्नेहल संतोष देसाई (वय ४५), विनिती राकेश देसाई (वय ३५) यांचा समावेश आहे. त्यांतील सहा जणांच्या हाडांना दुखापत झाली असून चार जणांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. किरकोळ जखमींमध्ये चिन्मय संतोष देसाई (वय १८), जान्हवी संतोष देसाई (वय २०), तीर्था राकेश देसाई (वय २), उर्मिला उल्हास देसाई (वय ५२), भक्ती उल्हास देसाई (वय २६) यांचा समावेश आहे. या सर्वांवर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. सर्व एकाच कुटुंबातील असल्याने ज्या गंभीर जखमी रुग्णांना अधिक उपचारांसाठी रत्नागिरीत पाठविण्यात आले, त्यांच्यासोबतच हे किरकोळ जखमी असलेले सर्व रुग्णदेखील रत्नागिरीत गेल्याचे डॉक्टर राम मेस्त्री यांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, सागर खंडागळे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तत्काळ जखमींना रिक्षाचालक संतोष सातोसे, नाना कुवळेकर यांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. यावेळी स्थानिक पोलीस पाटील श्री. धालवलकर यांसह ग्रामस्थांनीही जखमींना रुग्णालयात आणण्यास सहकार्य केले. महामार्गावर जाणार्या वाहन चालकांनी व प्रवाशांनीही यावेळी मदत केली.

राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री, डॉ. आर्यन, डॉ. प्रसन्न, डॉ. स्नेहल यांच्यासह कर्मचारी बोरकर, नाटेकर व त्यांच्या सहकार्यांनी रुग्णांवर तात्काळ उपचार केले.

अपघाताची माहिती मिळताच उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चालक नाना कुवळेकर, गणेश सुद, विकास सावंत यांनीही जखमींना उपचारासाठी आणणे व अधिक उपचारासाठी रत्नागिरीत नेण्यात मोलाचे सहकार्य केले. पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, मुबीन शेख, पोलीस हे.कॉ. नम्रता नामये आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात धाव घेत जखमींना मदत केली.

या प्रकरणी राजापूर पोलिसांनी चालक अक्षय यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande