
अमरावती, 13 सप्टेंबर (हिं.स.)
विदर्भाचे एकमेव पावसाळी पर्यटनाचे स्थळ असलेल्या चिखलदऱ्यामध्ये दोन महिन्यांमध्ये पाच लाख ५० हजार पर्यटक पोहोचले. त्याकरिता ६० हजार मोठी वाहने, तर २५ हजार दुचाकींचा वापर पर्यटकांनी केल्याची माहिती पुढे आली आहे. पावसाळ्यामध्ये शनिवार व रविवार वगळता इतर सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी चिखलदऱ्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात राहते. हे चित्र दरवर्षीच दिसून येते. वळणमार्ग व छोटे रस्ते असल्याने नेहमीच येथे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे पोलिस विभागाला वाहतूक नियंत्रणासाठी पावसाळ्यात शनिवार व रविवारी एकमार्गी वाहतूक व्यवस्था करावी लागते. त्याचे नियोजन यावर्षीच्या पावसाळ्यातसुद्धा केल्या गेले. परतवाडा ते चिखलदरा व चिखलदरा ते घटांग मार्गे परतवाडा, या संपूर्ण ८२ किलोमीटर मार्गावर भरपावसात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नियमित पर्यटकांव्यतिरिक्त मद्यप्राशन करून धुडगूस घालणारे बरेच उत्साही पर्यटकसुद्धा या काळात येथे पोहोचतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची तपासणी नियमित स्वरूपात केल्या जाते. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांसाठी ‘ब्रीथ ॲनालायझर’चा वापर करण्यात येतो.
पोलिसांचा मोठा ताफा तैनात
पावसाळ्यात बंदोबस्ताकरिता येथे २५ अधिकारी, १२५ कर्मचारी व त्यांच्या मदतीला १२५ होमगार्ड जवान तैनात करण्यात आले असून, पर्यटनाच्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास ती तत्काळ सोडविण्यासाठी १४ दुचाकींवर २८ पोलिस अंमलदारांना तैनात केलेले आहे.
ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे गर्दीवर नियंत्रण
चिखलदरा पर्यटनाकरिता मोठ्या प्रमाणात महिला व युवती येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक कार्यरत करण्यात आले आहे. पर्यटनाच्या ठराविक मार्गावर प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. सोबतच पी. ए. सिस्टिम लावण्यात आली असून, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे गर्दी व वाहतुकीवर नियंत्रण ठेवल्या जाते.
-------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी