
बीड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। परळी वैद्यनाथ येथे महापारेषण मार्फत ७६५ के.व्ही. अति उच्चदाब उपकेंद्र व विद्युत जोडणी प्रकल्पास राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने १३४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
राज्य सरकारने राज्यातील एकूण वीज मागणीचा विचार करता अतिउच्च दाब प्रणाली विकसित करण्यासाठी या प्रकल्पास परळी येथे उभारण्यास माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या विनंतीनुसार मान्यता दिली असून, याबद्दल मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत.
या उपकेंद्रामध्ये ७६५ के.व्ही. अतिउच्च दाब उपकेंद्र, १५०० क्षमतेचे ३ ट्रान्सफॉर्मर, यांसह आवश्यक विद्युत जोडणी इत्यादी कामे करण्यात येणार असून, यामुळे विद्युत निर्मिती व पारेषण क्षेत्रात परळीचे वजन वाढणार आहे तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीस वाव मिळणार आहे. येत्या काही दिवसातच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून शासकीय शिक्षण संस्था, शासकीय व्यावसायिक शिक्षण संस्था, पायाभूत सुविधा, तीर्थक्षेत्र विकास अशा विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी परळी मतदारसंघास प्राप्त होत असून, अनेक विकासकामे व रोजगार निर्मिती प्रगतीपथावर आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis