
रायगड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। सामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणी स्थानिक पातळीवरच तातडीने सुटाव्यात यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार अशा सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांना दररोज दुपारी ३ ते ५ ही दोन तासांची वेळ सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे अधिकारी जागेवर नसल्याने नागरिकांना मंत्रालयापर्यंत माराव्या लागणाऱ्या फेऱ्या थांबण्यास मोठी मदत होणार आहे.
महसूल कार्यालयांमध्ये नागरिक विविध कामांसाठी किंवा गाऱ्हाणी घेऊन जातात, मात्र संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांचा मोठा वेळ वाया जातो. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने कडक पावले उचलली आहेत. राखीव केलेल्या या दोन तासांत कोणतीही अंतर्गत बैठक अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या वेळेत अधिकाऱ्यांना केवळ कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांचे म्हणणे ऐकून त्यावर कार्यवाही करावी लागणार आहे.
कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताची मध्यवर्ती नोंदवहीत नोंद ठेवली जाईल; ज्यामध्ये तक्रारीचे स्वरूप व त्यावर झालेली कारवाई नोंदवली जाणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणि अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर '३ ते ५' या वेळेचा फलक ठळकपणे लावणे बंधनकारक आहे.
या निर्णयामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी होईल अशी अपेक्षा आहे. आता प्रत्यक्षात अधिकारी जागेवर राहून सामान्यांना कितपत दिलासा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)