
वर्धा, 13 सप्टेंबर (हिं.स.)
वाढत्या प्रदूषणावर मात करण्याकरिता पर्यावरपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे सर्वत्र आवाहन होत आहे. या आवाहनाला प्रतिसाद आणि गोवंशाचे संवर्धन असा दुहेरी उद्देश ठेवत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गवळाऊ गायीच्या गोमयापासून पर्यावरणपूरक ‘ईको फ्रेंडली’ गणपती मूर्तीं तयार केल्या आहेत. या उपक्रमाच्या विक्रीचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. सोमण यांनी स्वतः पहिल्या मूर्तीची खरेदी करून या पर्यावरणपूरक उपक्रमाला प्रोत्साहन दिले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. गवळाऊ शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, हेटीकुंडी आणि गवळाऊ सेंद्रिय निविष्ठा महिला बचत गट, हेटीकुंडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे आणि प्रक्षेत्राच्या व्यवस्थापक डॉ. पूजा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. व्ही. वंजारी, जिल्हा व्यवस्थापक विपणन मनीष कावडे, उपजीविका व्यवस्थापक प्रतीक मुनेश्वर, कारंजा तालुका अभियान व्यवस्थापक हेमंत काकडे तसेच महिला बचत गटाच्या मंगला कौरती, माला डोंगरे, ममता आसोले, शिल्पा पाटील, सुरेखा इवनाते आदी उपस्थित होते.
मूर्ती शंभरटक्के विघटनशील
गोमयापासून तयार केलेल्या या मूर्ती १०० टक्के विघटनशील व पर्यावरणपूरक असून, त्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला आहे. गणेशोत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर त्याचा झाडांसाठी सेंद्रिय खत म्हणूनही वापर करता येणार आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच गवळाऊ गायींच्या संवर्धनाला हातभार लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी