नेरळ-कशेळे बस अचानक बंद; २५० विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी
पास खिशात, तरी विद्यार्थ्यांची पायपीट रस्त्यावर! रायगड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। नेरळ-वाकस मार्गे कशेळे अशी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली बस सेवा अचानक बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा मोठी पायपीट सुरू झाली आहे. ऐन शैक्षणिक व
Future of 250 students hangs in the balance; ST administration shuts down Neral-Vakas-Kashele bus service.


पास खिशात, तरी विद्यार्थ्यांची पायपीट रस्त्यावर!

रायगड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। नेरळ-वाकस मार्गे कशेळे अशी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली बस सेवा अचानक बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा मोठी पायपीट सुरू झाली आहे. ऐन शैक्षणिक वर्षात बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, संतप्त विद्यार्थी व पालकांकडून ही बस सेवा तत्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कर्जत प्रेस असोसिएशन, किसान क्रांती संघटना आणि आरपीआय (आठवले गट) यांच्या वतीने परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यांच्या मागणीनुसार ३ ऑगस्ट रोजी नेरळ-वाकस-कशेळे ही बस सेवा सुरू करण्यात आली होती. बस सुरू झाल्यानंतर परिसरातील सुमारे २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी नियमित प्रवासासाठी एसटीचे मासिक पास काढले होते. सुरुवातीला काही दिवस विद्यार्थ्यांनंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठीही अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या गेल्या, मात्र नंतर केवळ विद्यार्थ्यांसाठीच बस मर्यादित ठेवण्यात आली.

बस बंद असल्याने पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा शोध घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचाही फटका बसत आहे. रिक्षा चालक-मालक संघटनेचे काही चालक विद्यार्थ्यांना इको किंवा रिक्षांमध्ये घेण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. एसटी बस बंद आणि खासगी वाहनांचा आधार नाही, अशा कात्रीत विद्यार्थी अडकले आहेत.

पैसे भरून पास काढूनही जर बस धावणार नसेल, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. परिवहन मंडळाने (एसटी महामंडळ) या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नेरळ-कशेळे विद्यार्थी बस सेवा विनाविलंब पुन्हा सुरू करावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande