
डोंबिवली, 13 सप्टेंबर, (हिं.स.)। डोंबिवलीची कन्या आणि स. वा. जोशी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिक्षण घेणाऱ्या कु. अदिती प्रविण सकपाळ हिने अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत आमदार राजेश मोरे यांनी तिच्या घरी जाऊन सत्कार केला. यावेळी स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे, शिवसेना पदाधिकारी योगेंद्र भोईर उपस्थित होते. अदिती हिला नासाकडून कनिष्ठ वैज्ञानिक म्हणून मिळालेल्या मान्यतेबद्दल आमदार मोरे यांच्यासह सर्वांनी अदितीचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक व वैज्ञानिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अदितीने अवकाश संशोधनात विशेष रुची घेत तब्बल १६ लघुग्रहांचा शोध घेतला आहे. त्यापैकी २०२४ डब्ल्यूए९५, २०२४ डब्ल्यूक्यू३९ आणि २०२४ एफओ७ या तीन संभाव्य लघुग्रहांच्या नोंदी नासाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्याचे सांगण्यात येते. तिच्या या कामगिरीमुळे डोंबिवलीसह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
लहानपणापासूनच तारे, ग्रह आणि अवकाशातील गूढ विश्वाबद्दल कुतूहल असलेल्या अदितीने इयत्ता आठवीपासून ताऱ्यांचे नियमित निरीक्षण सुरू केले. पुढे या छंदाचे रूपांतर अभ्यास व संशोधनात करत तिने लघुग्रहांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले.
दरम्यान, पुण्यातील अंतराळविद्या विद्यापीठाच्या निवड प्रक्रियेतही अदितीने अव्वल स्थान मिळवत अंतराळ अभ्यासक म्हणून निवड झाल्याचे वृत्त आहे. डॉ. युवराज लांबोळे आणि प्रवीण वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत अंतराळ प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही तिच्याकडे सोपवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्वतःच्या यशापुरते मर्यादित न राहता इतर विद्यार्थ्यांमध्येही अवकाश विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी अदिती प्रयत्नशील आहे. तिच्या या वैज्ञानिक कामगिरीमुळे डोंबिवलीचे नाव अभिमानाने उंचावले असून, तिची वाटचाल भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi