'बाप्पा डॉट ओआरजी’द्वारे महाराष्ट्राचा गणेशोत्सव जागतिक पटलावर
नाशिक, 13 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोचा (UNESCO) अमूर्त जागतिक सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) दर्जा मिळवून देण्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे डिजिटल दस्तऐव
रत्नागिरी जिल्ह्यात दीड लाखाहून अधिक घरगुती, सव्वाशेहून अधिक सार्वजनिक गणेशमूर्तींची सोमवारी प्रतिष्ठापना


नाशिक, 13 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोचा (UNESCO) अमूर्त जागतिक सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) दर्जा मिळवून देण्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘बाप्पा डॉट ओआरजी’ (bappa.org) हा अभिनव डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, या माध्यमातून कला, संस्कृती, ज्ञान, परंपरा आणि उद्योजकतेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पुरातत्त्व संचालनालयामार्फत विकसित करण्यात आलेल्या अधिकृत पोर्टलद्वारे महाराष्ट्रासह देशभरातील तसेच जगातील ३५ हून अधिक शहरांमधील नागरिकांना आपल्या घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाची छायाचित्रे, व्हिडिओ, सजावट, कौटुंबिक विधी, ऐतिहासिक आठवणी, पारंपरिक खाद्यसंस्कृती आदींची माहिती व्हॉट्सअॅप व ऑनलाइन माध्यमातून नोंदविता येणार आहे. गणेशोत्सवाच्या या बहुआयामी सांस्कृतिक परंपरेत मूर्तिकार, लोककलावंत तसेच विविध पारंपरिक कलांशी संबंधित कारागिरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या कलापरंपरांचे कायमस्वरूपी डिजिटल दस्तऐवजीकरण करून त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणे तसेच महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला गती देणे, हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

या डिजिटल अभियानात सहभागी होऊन आपल्या घरातील किंवा परिसरातील गणेशोत्सवाची माहिती नोंदविणाऱ्या नागरिकांना शासनातर्फे ‘डिजिटल कल्चरल प्रिझर्वर प्रमाणपत्र’ (Digital Cultural Preserver Certificate) देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या परंपरा जतन करण्यासोबतच नागरिकांचा या सांस्कृतिक लोकचळवळीत सक्रिय सहभाग वाढणार आहे.

नाशिकमध्ये व्यापक जनसहभागावर भर

राज्यस्तरीय या मोहिमेची नाशिक जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी, सुलभ समन्वय आणि विविध विभागांचा एकसंघ सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक नगरपरिषद प्रशासनाचे सहआयुक्त श्याम गोसावी यांची नाशिक जिल्ह्याचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सहआयुक्त श्याम गोसावी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती तसेच नागरिकांना या अभियानात सहभागी करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख गणेशोत्सव मंडळे, बसस्थानके, रेल्वे स्थानके, नागरी सुविधा केंद्रे आणि शासकीय कार्यालयांमध्ये व्हॉट्सअॅप क्यूआर कोड असलेले होर्डिंग्ज लावण्यात येणार असून, डिजिटल स्क्रीन, सोशल मीडिया तसेच अन्य प्रचारमाध्यमांतून bappa.org या डिजिटल मंचाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी या अभिनव उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या गणेशोत्सवाच्या परंपरा, कला आणि सांस्कृतिक वारशाचे डिजिटल जतन करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande