गडकरी साहेब, आमचा कोकणचा रस्ता कधी सुधारणार? संतापलेल्या चाकरमान्यांचा सवाल
रायगड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि भीषण वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. वडखळ, कोलाड, माणगाव, इंदापूर, महाड, पोलादपूर आणि भरणे नाका या प्रमुख टप्प्यांव
Mr. Gadkari, when will the road in our Konkan region be improved? An angry question posed directly by commuters.


रायगड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि भीषण वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. वडखळ, कोलाड, माणगाव, इंदापूर, महाड, पोलादपूर आणि भरणे नाका या प्रमुख टप्प्यांवर वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांब रांगा लागल्याने महामार्गावरील वाहतूक अक्षरशः ठप्प झाली. तासन्तास एकाच जागी अडकून पडल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना आरक्षण न मिळाल्याने हजारो नागरिकांनी एसटी बस आणि खासगी वाहनांचा मार्ग निवडला. मात्र, महामार्गावर येताच आनंदाच्या प्रवासाचे रूपांतर मानसिक त्रासात झाले. रस्त्यावर पडलेल्या अवाढव्य खड्ड्यांमुळे चालकांना वाहने अत्यंत धिम्या गतीने चालवावी लागत आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग कमालीचा मंदावला असून मागे वाहनांची प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील वाहनांची संख्या अचानक वाढल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.

महामार्गाच्या चौपदरीकरणाला अनेक वर्षे लोटली तरी कामाची गती संथच आहे. दरवर्षी गणेशोत्सवात खड्डे बुजवण्याचे केवळ सोपस्कार केले जातात, मात्र मुसळधार पावसात ते वाहून जातात. सोशल मीडियावरही महामार्गाच्या दुरवस्थेवरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी होत आहे. गणरायाच्या आगमनापूर्वीच चाकरमान्यांना खड्डे, धूळ आणि संथ वाहतुकीचा सामना करावा लागत असल्याने यंदाचा कोकण प्रवास अत्यंत वेदनादायी ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande