नागोठणे बस स्थानक की चिखलाचे डबके? गणेशभक्तांचा प्रवास अग्निपरीक्षेचा!
रायगड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि मध्यवर्ती केंद्र मानल्या जाणाऱ्या नागोठणे येथील एसटी बस स्थानकाला सध्या तळ्याचे स्वरूप आले आहे. स्थानकाच्या आवारात ठिकठिकाणी पडलेले अवाढव्य खड्डे आणि त्यात साचलेले चिखलमय पाणी यामुळे स्
Nagothane Bus Station or a Mud Puddle? A Trial by Fire for Ganesha Devotees!


रायगड, 13 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि मध्यवर्ती केंद्र मानल्या जाणाऱ्या नागोठणे येथील एसटी बस स्थानकाला सध्या तळ्याचे स्वरूप आले आहे. स्थानकाच्या आवारात ठिकठिकाणी पडलेले अवाढव्य खड्डे आणि त्यात साचलेले चिखलमय पाणी यामुळे स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे आणि गणेशभक्तांचे स्वागत याच चिखलाच्या डबक्यांनी होत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नागोठणे हे केवळ स्थानिक प्रवाशांचेच नव्हे, तर परिसरातील औद्योगिक कंपन्यांमधील कामगार, खरेदी-विक्रीसाठी ग्रामीण भागातून शहरात येणारे नागरिक आणि मुंबई, श्रीवर्धन, महाड, पोलादपूरसह संपूर्ण कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे जंक्शन आहे. सण-उत्सवाच्या काळात येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळते. मात्र, स्थानक आवारातील चिखलातून वाट काढताना महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी दमछाक होत आहे.

अंगावर चिखल आणि उडणाऱ्या दगडांची भीती आवारात बसेस ये-जा करताना खड्ड्यांमधील चिखलयुक्त पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असून कपडे खराब होत आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे, चाकांखाली खड्ड्यातील टोकदार दगड येऊन ते वेगाने उडून प्रवाशांना लागल्यास मोठी दुखापत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बसमध्ये चढताना-उतरताना घसरून पडण्याचा धोकाही वाढला आहे.

लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी गावी निघालेल्या भाविकांना या गैरसोयीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन सण-उत्सवाच्या काळात तरी हे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी एकमुखी मागणी प्रवाशांकडून होत आहे.प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्थानक आवारातील खड्डे बुजवून परिसर तात्काळ सुरळीत करावा, यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.

- मनोहर पवार, वाहतूक नियंत्रक, नागोठणे एसटी स्थानक

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande