
नातेवाईकांनी मृतदेह नेला महापालिकेत, प्रशासनाने नातेवाईकांचे आरोप फेटाळले
नाशिक, 13 सप्टेंबर (हिं.स.)।
- शहरातील कृषी नगर जॉगिंग ट्रॅकजवळ कामावरून घरी परतत असताना रात्रीच्या वेळी पावसामुळे आणि अंधार असल्यामुळे रस्त्यात आडवे टाकलेले काळे पाइप्सवर दुचाकी धडकल्याने सिद्धार्थ गोरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१२) रात्री घडली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणी महानगरपालिकेने आरोप फेटाळले असून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तर मयत सिद्धार्थ गोरेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी मृतदेह थेट नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नेत ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी मुख्य गेटला कुलूप लावल्याने नागरिकांनी मृतदेह गेटबाहेर ठेवत ठिय्या दिला आहे.
मयत सिद्धार्थ गोरे आणि मनोज सूर्यवंशी हे दोन मित्र कामावरून घरी जात असताना कृषी नगर जॉगिंग ट्रॅकजवळ पाण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू होते. रात्रीच्या वेळी पावसामुळे आणि अंधार असल्यामुळे रस्त्यात आडवे टाकलेले काळे पाइप्सच्या अगोदर चिखल साचलेला होता. त्या ठिकाणी सुरक्षेसाठी कोणतेही रिफ्लेक्टर लावले नसल्याने दुचाकी थेट पाईपला जाऊन धडकल्याने सिद्धार्थ गोरे या तरुणाचा मृत्यू झाला. तर मनोज सूर्यवंशी हा गंभीर जखमी झाला. प्रशासकीय कामांदरम्यान नागरिकांची काळजी घेण्यासाठी योग्य सुरक्षा उपाय , सूचना फलक व आदी गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक असतानाही ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या सर्व प्रश्नावरती महानगरपालिकेच्या वतीने खुलासा करण्यात आला असून प्रत्यक्षदर्शीने पाहणी करण्यात आलेली आहे या पाहणीच्या वेळेस ठेकेदाराकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आलेली आहे. यामध्ये म्हटलेले आहे की गाडीची अवस्था बघितली तर गाडी खूपच वेगळाच होती ती नियंत्रणात आलेली नाही असे दिसून येत आहे ठेकेदाराच्या वतीने या ठिकाणी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली होती काळ्यापायपाला आवश्यक ती दिसणारी पट्टी लावण्यात आलेली होती पन्नास मीटर वरती काम चालू असल्याचा बोर्ड देखील लावण्यात आलेला होता अशा स्वरूपाची माहिती देण्यात आली आहे याबाबत महानगरपालिकेच्या शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितले की या सर्व प्रकरणावरती आवश्यक ती मदत संबंधित परिवाराला केली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI