मेळघाटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ
अमरावती, 13 सप्टेंबर (हिं.स.) मेळघाटातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून आजारांचे वेळीच निदान करण्याची जबाबदारी असलेल्या चिखलदरा तालुक्यातील शालेय आरोग्यतपासणी पथकाची खासगी वाहने दीर्घकाळापासून बंद असल्याची गंभीर बा
मेळघाटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ


अमरावती, 13 सप्टेंबर (हिं.स.)

मेळघाटातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून आजारांचे वेळीच निदान करण्याची जबाबदारी असलेल्या चिखलदरा तालुक्यातील शालेय आरोग्यतपासणी पथकाची खासगी वाहने दीर्घकाळापासून बंद असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शाळा सुरू होऊन तीन महिने उलटले असतानाही पथकाच्या डॉक्टरांना दुर्गम शाळांमध्ये पोहोचण्यासाठी वाहनांची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी रखडल्याची माहिती आहे.

वाहनांचे बिल थकीत असल्याने वाहनचालकांनी सेवा बंद केल्याची माहिती असून, त्याचा थेट परिणाम डॉक्टरांच्या शाळा भेटींवर होत आहे. परिणामी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या नियमित आरोग्यतपासणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज असताना वाहनांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. चिखलदरा तालुक्यातील अनेक शाळा व आश्रमशाळा डोंगरदऱ्यांमध्ये आणि अतिदुर्गम भागात आहेत. या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी शालेय तपासणी पथकातील डॉक्टरांना नियमित दौरे करावे लागतात. मात्र, वाहनांची सुविधा ठप्प असल्याने डॉक्टरांना शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी अनेक ठिकाणी आरोग्यतपासणी वेळेत होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्दी, ताप, रक्ताक्षय, त्वचारोग, कुपोषण तसेच अन्य आजारांची लक्षणे आढळल्यास त्यांचे वेळीच निदान व उपचार होणे आवश्यक आहे. मात्र, आरोग्यतपासणी पथकच वेळेवर शाळांमध्ये पोहोचत नसेल तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न पालक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज असताना केवळ वाहनांचे बिल थकल्याने आरोग्यतपासणीची यंत्रणा प्रभावित होत आहे. दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविणाऱ्या पथकांकडेच वाहतुकीची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांच्या नियमित तपासणीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

बिल थकल्याने डॉक्टरांचे दौरे प्रभावित

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून विविध आरोग्य योजना राबविल्या जातात. मात्र, दुर्गम भागात सेवा पोहोचविणाऱ्या यंत्रणेची वाहनेच बंद असतील तर या योजनांचा अपेक्षित लाभ विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तातडीने पर्यायी वाहनव्यवस्था करून शालेय आरोग्यतपासणी पथकाचे दौरे सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

स्थानिक स्तरावर सूचना देणार

राज्यातील शालेय आरोग्य पथकातील वाहनधारकांना कमी मोबदल्यात वाहने चालविणे परवडत नसल्याने त्यांनी वाहतूक सेवा बंद केली आहे. मात्र, स्थानिक स्तरावर शालेय पथकातील डॉक्टरांना स्वतःची वाहने वापरण्याची परवानगी देण्यात आली असून, बहुतांश जिल्ह्यांत या माध्यमातून शालेय आरोग्यतपासणीचे काम सुरू आहे. मेळघाटातील परिस्थिती लक्षात घेता याबाबत स्थानिक स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येतील, असे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी सांगितले.

-----------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande