
हिंगोली, 13 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ‘मराठवाड्याचा विकास… तुम से ना हो पायेगा!’ या घोषवाक्याखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या मराठवाडाव्यापी जनआंदोलनांतर्गत हिंगोली येथे शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले.
विविध सरकारांच्या काळात मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन हिंगोलीच्या विकासासाठी हळद संशोधन केंद्र, शहर रस्ते विकास, औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास व पाणीपुरवठा, उच्च पातळी बंधारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे रुग्णालय, लायगो-इंडिया संशोधन केंद्र, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे उड्डाणपूल, नाबार्डअंतर्गत रस्ते-पूल व सिंचन प्रकल्प अशा अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. मात्र घोषणा झाल्या, वर्षे उलटली; तरीही अनेक प्रकल्प रखडलेलेच आहेत! काही कामे संथगतीने सुरू आहेत, तर काहींची अंमलबजावणी अद्यापही अपेक्षित आहे. त्यामुळे हिंगोलीच्या जनतेला केवळ घोषणा नकोत, प्रत्यक्ष विकासकामे आणि त्यांचा हिशोब हवा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis