
परभणी, 13 सप्टेंबर (हिं.स.) सन १८९४ मध्ये मराठवाड्यातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी चिंतामणी महादेव मंदिर येथे तत्कालीन स्वातंत्र्यसैनिकांनी एकत्र येऊन श्री चिंतामणी महादेव मंदिर गणेश मंडळाची स्थापना केली. या ऐतिहासिक परंपरेला यंदा १३२ वर्षे पूर्ण होत आहेत. या मंडळाचा उद्देश केवळ धार्मिक उत्सव साजरा करणे एवढाच मर्यादित राहिला नाही. लोकजागृती, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक प्रबोधन आणि राष्ट्रविचारांचा प्रसार हे मंडळाच्या कार्याचे प्रमुख आधारस्तंभ राहिले आहेत. व्याख्याने, मेळे, पोवाडे, कीर्तन तसेच विविध सामाजिक व राष्ट्रीय विषयांवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची परंपरा मंडळाने सातत्याने जपली आहे.
निजामाच्या राजवटीत थेट राजकीय विरोध करणे कठीण होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रतीकात्मक स्वरूपात स्वातंत्र्य, स्वराज्य आणि राष्ट्रभावनेचे विचार जनतेपर्यंत पोहोचविले जात. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणून सामाजिक प्रश्नांवर चर्चा, व्याख्याने, पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात. यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक जागृती, राष्ट्रभक्ती आणि जनसंघटनाचे प्रभावी व्यासपीठ ठरला. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या काळात श्री चिंतामणी गणेश मंडळाच्या संस्थापक सदस्य ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचे मोलाचे योगदान राहिले. सन १९४८ मध्ये हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त झाले. त्यानंतर मराठवाड्यातील गणेशोत्सवाला अधिक मुक्त वातावरण मिळाले आणि विविध सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रजागृतीपर कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. श्री चिंतामणी महादेव मंदिर गणेश मंडळाने आपल्या प्रदीर्घ वाटचालीत जिंतूर शहरातील सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आहे. मंडळाच्या विविध कार्यक्रमांना बालगंधर्व, ‘कान्होपात्रा’ या सांस्कृतिक परंपरेशी संबंधित कलावंतांसह प्रख्यात गायिका हिराबाई बडोदेकर, पंडित जसराज, प्रभा अत्रे, प्रसाद सावकार तसेच विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. नजीकच्या काळात पद्मश्री दादा लाड, अभिनेते योगेश सोमण, माधवानंद महाराज, हभप दस्तापूरकर महाराज, हभप गोसावी महाराज त्र्यंबकेश्वर, योगेश साळेगावकर यांसह आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मंडळास भेट देऊन विविध कार्यक्रमांत सहभाग नोंदविला आहे.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis