
सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।
सोलापूर जिल्ह्यात काल झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ४ हजार ४७० प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड झाली.
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित या लोकअदालतीत ३४ हजार ६९६ प्रलंबित आणि ३४ हजार ७४९ दाखलपूर्व, अशी एकूण ६९ हजार ४४५ प्रकरणे ठेवण्यात आली होती.
यापैकी १ हजार ७४२ प्रलंबित प्रकरणांमध्ये सामंजस्याने तडजोड झाली. या प्रकरणांची एकूण तडजोड रक्कम ३७ कोटी ९२ लाख १८ हजार ६७९ रुपये आहे. तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी २ हजार ७२८ प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून, त्यांची एकूण रक्कम ११ कोटी ७७ लाख १ हजार ४३९ रुपये आहे.
मोटार अपघात न्यायाधिकरणासमोरील एका प्रकरणात मृताच्या आई, पत्नी आणि मुलीला ७१ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. सुमारे १४० भूखंडधारकांच्या दाव्यासह ४० लाख आणि ४७ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईच्या प्रकरणांमध्ये झालेली तडजोडही या लोकअदालतीची वैशिष्ट्ये ठरली.
अपघातातील जीवितहानी किंवा दुखापत भरून निघू शकत नसली, तरी नुकसानभरपाईमुळे संबंधित कुटुंबांची भविष्यातील चिंता काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड