
ठाणे, 13 सप्टेंबर (हिं.स.)। ठाणे महापालिका परिवहन समितीच्या (`टीएमटी') भ्रष्टाचारी कारभाराविरोधात भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी महासभेत प्रहार केला. ठाणे शहर भीषण वाहतूककोंडीत अडकले असताना `टीएमटी' बसच्या कंत्राटदाराला एक बस दररोज १७० ते १८० किलोमीटर प्रवास करीत असल्याचे बिल दिले जात आहे. तर तिकिटाच्या डिजिटल मशीनमधून अर्धे पैसेच `टीएमटी'ला मिळत असून, निम्म्या पैशांवर डल्ला मारला जात आहे, असा घणाघाती आरोप नगरसेवक नारायण पवार यांनी केला. या प्रकरणांबाबत ठोस पुरावे देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
`टीएमटी' प्रशासनातर्फे १८० एसी ई-बसेस जीसीसी पद्धतीने चालविण्याचा प्रस्ताव महासभेत शुक्रवारी मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. त्यावेळी `टीएमटी'तील गैरप्रकारांची मालिका नारायण पवार यांनी मांडली. तब्बल १०० कोटी रुपये थकीत असूनही कंत्राटदार काम कसा करतो, असा सवाल करून धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या `टीएमटी'ची दारुण अवस्था झाली असल्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी संबंधित प्रस्तावाबाबत सर्व तांत्रिक मुद्दे व आरोप जाणून घेऊन महापौरांच्या दालनात बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. तोपर्यंत हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला.
`टीएमटी' बसच्या कंत्राटदाराने पुरविलेली छोटी बस दररोज १८० व मोठी बस १७० किलोमीटर फिरेल, अशा हिशोबाने प्रति किलोमीटर ९८ रुपयांप्रमाणे बिल दिले जात आहे. बस बंद पडली तरी कंत्राटदाराला १८० किलोमीटरचे पैसे दिले जातात. ठाण्यातील प्रत्येक रस्त्यावर कोंडी आहे. सॅटीस पुलावर बसच्या रांगा लागतात. अशा परिस्थितीत एक बस १८० किलोमीटर कशी फिरू शकते. ठाण्याशेजारील इतर महापालिकांमध्ये कंत्राटदाराला ६४ रुपये किलोमीटर दर असताना, `टीएमटी' एवढा दर मंजूर का करते, असा सवाल नारायण पवार यांनी केला.
डिजिटल मशीनद्वारे `टीएमटी'मध्ये प्रवाशांना तिकीट दिली जातात. त्याचे व्यवस्थापन कंत्राटदाराकडील केवळ एक व्यक्ती करते. एकूण प्रवाशांपैकी निम्म्या प्रवाशांची तिकीटे `टीएमटी'च्या खात्यात जमा होतात. तर उर्वरित प्रवाशांची तिकिटांची रक्कम वाटून घेतली जाते. अशा पद्धतीने दोन ते तीन प्रकरणे उघडकीस आली. मात्र, कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत आपल्याकडे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. या पुराव्यांबरोबरच `टीएमटी'च्या कारभारावर दिवसभर महासभेत चर्चा चालेल, असा टोला नारायण पवार यांनी मारला.
`टीएमटी' बसच्या तिकीट तपासनीसांकडून दररोज किती प्रवाशांवर कारवाई केली जाते. याच तिकीट तपासनीसांना किती वेतन मिळते, याचा खुलासा करावा, अशी मागणी करतानाच `टीएमटी' बस दुरुस्तीसाठी नियुक्त केलेल्या मेकॅनिकल इंजिनियर आता सुरक्षारक्षक झाले आहेत, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले. `टीएमटी'च्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणीही थकीत असून, या कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवात एक हप्ता देण्याची मागणीही नारायण पवार यांनी केली.
...तर नंदलाल समितीप्रमाणे
पुन्हा नगरसेवक आरोपी होतील'
`टीएमटी'चा उपयोग ठाणेकर प्रवाशांना होत नसून, केवळ कंत्राटदारांना होत आहे. कंत्राटदाराच्या हिताचे प्रस्ताव महासभेत घाईघाईत मंजुरीसाठी आणले जातात. त्याची जबाबदारी नगरसेवकांवर येते. यापूर्वी नंदलाल समितीने महासभेत मंजूर झालेल्या ठरावाबद्दल नगरसेवकांना दोषी ठरविले. त्यात महापालिकेचे अधिकारी व कंत्राटदार मोकळे राहिले होते. आता अशाच पद्धतीने ठराव मंजूर केल्यास पुन्हा एकदा नंदलाल समितीप्रमाणे नगरसेवकांना आरोपी ठरविणार का, असा सवाल नगरसेवक नारायण पवार यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर