
बीड, 13 सप्टेंबर (हिं.स.) बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दि. १६ सप्टेंबर रोजी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा योग्य निर्णय घेण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडणार आहे, अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली
मतदारसंघातील आष्टी तालुका व त्यापाठोपाठ शिरूर व पाटोदा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळबाग क्षेत्र असून, आष्टी तालुक्यात संत्रा, डाळिंब, लिंबू, मोसंबी, केळी, ड्रॅगन फ्रूट, द्राक्षे, खजूर, केशर, आंबा यांसह अन्य फळपिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. शेतकरी मागील चार ते पाच वर्षांपासून या फळबागा जोपासत आहेत आणि सद्यस्थितीत दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे या फळबागा नष्ट होऊ नयेत, झाडे जळून जाऊ नयेत, यासाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या धोरणाचा योग्य अभ्यास करून, हा विषय शासनदरबारी मांडून सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी तालुका महसूल अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना पुढील दोन दिवसांत संपूर्ण माहिती व सविस्तर आकडेवारी सादर करण्याबाबत विनंती केली.
या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीस उपविभागीय अधिकारी सौ. वसीमा शेख (उपविभाग पाटोदा), तहसीलदार श्री. निलावाड साहेब, तहसीलदार श्री. घोळवे साहेब, तहसीलदार सौ. वैशाली पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री. गोरख तरटे साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री. गांगर्डे साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री. आंधळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis