
प्राधिकरणाकडून पर्यायी जागेचा शोध सुरू
नाशिक , 13 सप्टेंबर (हिं.स.)।
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे दर्शन पथासाठी उपजिल्हा रुग्णालयासह पशु वैद्यकीय दवाखानाही पाडण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालय पाडकामास विरोध दर्शविण्यात आला असला तरी पशु वैद्यकीय दवाखाना पाडू नये, यासाठी कोणीही पुढे आले नाही. प्रशासकीय पातळीवर गावातच नवीन जागा मिळण्यासंदर्भात टोलवाटोलवी होत असतांना कुंभमेळा प्राधिकरणच्या पुढाकाराने पशुवैद्यकीय दवाखान्यास त्र्यंबकेश्वर गावात तात्पुरत्या स्वरूपात जागा मिळाल्याने पशुवैद्यकीय विभागाला दिलासा मिळाला आहे.
त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी येणारी गर्दी शहरात येऊ नये, त्यांनी दर्शन करून तसेच पुढे जावे, यासाठी दर्शनपथ तयार करण्यात येत आहे. या कामात तहसील कार्यालय, पशु वैद्यकीय दवाखाना, उपजिल्हा रुग्णालय यांचा अडथळा येत आहे. उपजिल्हा रुग्णालय पाडण्यास स्थानिकांनी विरोध दर्शविल्याने सध्या रुग्णालय पाडकामास स्थगिती देण्यात आली आहे. मात्र तहसील कार्यालय पुढील आठवड्यात पाडण्यात येणार असल्याने त्र्यंबकेश्वर मधील बचत गट भवनात हे कार्यालय स्थलांतरीत करण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग सुरू असून अन्य कामे तुपेवाडी येथील रुग्णालय परिसरातून सुरू आहेत.
याउलट स्थिती पशुवैद्यकीय दावाखान्याची आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहाहून अधिक गावांमधील ५० हजाराहून अधिक पशुधनाची जबाबदारी दवाखान्यावर असतांना या दवाखान्यास प्रारंभी गावात जागा मिळाली नाही. नगरपालिकेलाही ती मिळवून देता आली नाही. कुंभमेळा प्राधिकरणच्या वतीने तुम्ही जागा दाखवा, आम्ही इमारत बांधून देतो, असा पर्याय देण्यात आला. पशुवैद्यकीय विभागाला स्थानिक पातळीवर पाठिंबा न मिळाल्याने अखेर त्र्यंबकेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर आहे.
याविषयी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मेहेरे यांनी, नगरपालिकेशी जागेविषयी पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु, त्यांनी शहरात जागा नसल्याचे सांगितल्याची माहिती दिली. आमची इमारतही पाडण्याचा प्रयत्न झाला. तहसील कार्यालय स्थलांतराला सुरूवात झाल्याने आम्ही आता अंजनेरी येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात स्थलांतरीत होत असल्याचा पत्रव्यवहार कुंभमेळा प्राधिकरणाशी करत असतांना आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात जागा मिळाल्याचे डॉ. मेहेरे यांनी सांगितले. जुन्या तहसील कार्यालयाजवळील एका जुन्या कक्षात दवाखाना तात्पुरता स्थलांतरीत होत आहे. सध्या त्या कक्षाची दुरूस्ती करण्यात येत असल्याचे डॉ. मेहेरे यांनी नमूद केले.
चौकट
त्र्यंबकेश्वर येथील पशु वैद्यकीय दवाखान्या संदर्भात संबंधित विभागाकडून कायमस्वरूपी जागा मिळावी, यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जागेचा शोध सुरू आहे. सध्या दवाखान्यासाठी जुन्या तहसील कार्यालयाजवळ असलेल्या कक्षात व्यवस्था करण्यात आली आहे. कायमस्वरूपी जागेचा शोध सुरू आहे.
शेखर सिंह आयुक्त कुंभ मेळा प्राधिकरण
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI