पुणे - विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी; खड्डे अन् उंचसखल फुटपाथ पाहून अधिकाऱ्यांना सुनावले
पुणे, 13 सप्टेंबर (हिं.स.) गणेशोत्सवाला अवघा एक दिवस शिल्लक असताना विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामांचा बोजवारा उघड झाला आहे. गेल्या महिनाभरापासून रस्ते, फुटपाथ आणि चेंबर दुरुस्तीबाबत बैठका घेऊन तयारीचे आदेश देण्यात आले असतानाही अन
Ganpati


पुणे, 13 सप्टेंबर (हिं.स.) गणेशोत्सवाला अवघा एक दिवस शिल्लक असताना विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामांचा बोजवारा उघड झाला आहे. गेल्या महिनाभरापासून रस्ते, फुटपाथ आणि चेंबर दुरुस्तीबाबत बैठका घेऊन तयारीचे आदेश देण्यात आले असतानाही अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या पाहणी दौऱ्यात समोर आले.

दिवटे यांनी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून बेलबाग चौक ते टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, महात्मा फुले मंडई परिसर, केळकर रस्ता आणि कुमठेकर मार्गाची पाहणी केली. विसर्जन मिरवणुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या मार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे कायम असल्याचे आढळले. तसेच नादुरुस्त आणि उंचसखल फुटपाथ, रस्त्याच्या पातळीपेक्षा वर-खाली असलेली चेंबरची झाकणे आणि खोदाईनंतर पूर्ववत न केलेली कामेही निदर्शनास आली.

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सर्व खड्डे बुजविण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत कामे शिल्लक असल्याने दिवटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.

उर्वरित सर्व कामे तातडीने पूर्ण करून दोन दिवसांत अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश दिवटे यांनी दिले. पूर्ण केलेल्या कामांचे जिओ-टॅग्ड छायाचित्रेही अहवालासोबत सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande