मंडपांच्या अतिक्रमणाने पुण्यातील पेठ भागात वाहतूक कोंडी; पीक अवर्समध्ये वाहनचालक हैराण
पुणे, 13 सप्टेंबर (हिं.स.)। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती पेठ भागात गणेश मंडळांकडून देखावे आणि मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, काही लहान-मोठ्या मंडळांनी नियमांकडे दुर्लक्ष करत रस्त्यांच्या निम्म्यापेक्षा अध
ganapti


पुणे, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती पेठ भागात गणेश मंडळांकडून देखावे आणि मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, काही लहान-मोठ्या मंडळांनी नियमांकडे दुर्लक्ष करत रस्त्यांच्या निम्म्यापेक्षा अधिक भागात अवाढव्य मंडप उभारल्याने पेठ भागातील वाहतुकीचा पीक अवर्समध्ये बोजवारा उडत आहे. त्यामुळे गणेश मंडळांच्या मंडप आणि देखाव्यांचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्त्याला जोडणाऱ्या अरुंद गल्लीबोळांमध्ये मंडपांचे खांब, बांधकाम साहित्य तसेच देखाव्याच्या तयारीसाठी ठेवण्यात आलेल्या साहित्यामुळे रस्त्यांची उपलब्ध रुंदी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी, सकाळी आणि सायंकाळच्या पीक अवर्समध्ये वाहतुकीचा वेग मंदावत असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

या कोंडीचा फटका रुग्णवाहिका, पीएमपीएमएल बस तसेच नोकरदारांच्या वाहनांनाही बसत आहे. अरुंद रस्त्यांमुळे वाहनांना मार्ग काढणे कठीण होत असून, काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण होत आहे.

गणेशोत्सव हा पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा उत्सव असला तरी उत्सवाच्या तयारीमुळे सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतूक आणि नागरिकांची गैरसोय वाढू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यावरून चालणेही कठीण होईल इतक्या बेफिकिरीने मंडप उभारणे योग्य नसल्याचा संताप नागरिक आणि वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांच्या मंडपांना परवानगी देताना रस्त्याची उपलब्ध रुंदी, वाहतुकीची वर्दळ आणि आपत्कालीन वाहनांसाठी आवश्यक मार्ग यांचा विचार करून नियोजन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande