
पुणे, 13 सप्टेंबर (हिं.स.) गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या पुणे विभागातून तब्बल २६० अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. मात्र, या अतिरिक्त सेवांसाठी पुणे विभागातील इतर महत्त्वाच्या मार्गांवरील नियमित बसगाड्या कमी करण्यात आल्याने मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे. सोलापूर, लातूर, कोल्हापूर आणि नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना बसअभावी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून कोकणातील मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ही गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने कोकण मार्गावर अतिरिक्त बसगाड्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार पुणे विभागातून २६० अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत.
मात्र, अतिरिक्त बस उपलब्ध करून देताना पुणे विभागातील इतर महत्त्वाच्या मार्गांवरील नियमित फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली. त्यामुळे सोलापूर, लातूर, कोल्हापूर, नाशिक तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.
नियमित बसगाड्यांची संख्या कमी झाल्याने स्थानकांवर प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची संख्या आधीच वाढलेली असताना नियमित मार्गांवरील फेऱ्या कमी झाल्याने स्थानकांवरील गर्दी आणखी वाढली आहे.
कोकणातील प्रवाशांसाठी अतिरिक्त बसची व्यवस्था करताना इतर मार्गांवरील नियमित प्रवाशांची गैरसोय होणार नाही, यासाठी एसटी प्रशासनाने पर्यायी नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र, सध्या अनेक मार्गांवरील प्रवाशांना बसअभावी प्रतीक्षा करावी लागत असल्याने एसटीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु